मोदी वैश्विक नेते : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

मोदी वैश्विक नेते : उपमुख्यमंत्री फडणवीस

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अधिक आहे. ती जगभरात वाढत चालली आहे. त्यामुळेच विरोधकांकडून सातत्याने पंतप्रधान मोदी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, विरोधकांच्या कितीही पोटात दुखले तरी मोदींची लोकप्रियता कमी होणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

सोलापुरात नव्याने बांधण्यात आलेल्या महसूल भवनचा लोकार्पण सोहळा फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. सध्या ठाकरे अनेक पक्षांच्या नेत्यांच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी केजरीवाल, ठाकरे आणि शरद पवार ही मंडळी एकमेकांच्या विरोधात बोलत होती. ती मंडळी आता एकत्र येताना दिसत आहे. मात्र, विरोधकांनी किती ही आटापिटा केला तरीही मोदींची लोकप्रियता कमी होणार नाही. जगभरात देशाचा मान, सन्मान वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रपतींनी मोदींना बॉस म्हटले तर अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी मोदींची सही घेण्याची इच्छा व्यक्त केली. मोदी हे आता वैश्विक नेते झाले आहेत. त्यामुळे विरेाधकांच्या पोटदुखीला आम्ही भिक घालत नाही, असेही फडणवीस म्हणाले. मोदींची लोकप्रियता आणि बाहेरील देशात निर्माण झालेली त्यांची प्रतिमा याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटायला हवा, असेही ते म्हणाले.

Back to top button