बेघरमुक्त महाराष्ट्र करणार : देवेंद्र फडणवीस | पुढारी

बेघरमुक्त महाराष्ट्र करणार : देवेंद्र फडणवीस

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा आगामी काळात बेघरमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आहे. एससी, एसटी, ओपन प्रवर्गातील व्यक्तींसाठी 10 लाख घरे आणि स्वतंत्र नवीन पंतप्रधान मोदी आवास योजनेतून ओबीसींसाठी 10 लाख घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सोलापुरात केली.

महापालिका व सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांच्या वतीने विकसित केलेल्या इंद्रभुवन महापालिका प्रशासकीय इमारतीसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कळ दाबून करण्यात आले. यावेळी फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की सोलापूरसह राज्यभरात जे कोणी बेघर असतील त्या सर्वांना घर देण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. घराविना एकही व्यक्ती वंचित राहणार नाही. ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टी क्षेत्र आहे. त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा सर्वाधिक लाभ सोलापूर जिल्ह्याने घेतला आहे. जे गरीब, बेघर आहेत अशांना घरे बांधून देण्यात येणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.

हे सरकार सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी कटिबद्ध आहे. गतिशील असे हे सरकार आहे. 24 तास सामान्यांना दिलासा देण्यासाठी काम करतोय. गरीब, शेतकरी, कामगार, रोजगार संदर्भात या सरकारने तातडीने निर्णय घेतले. मुलीचा जन्म झाल्यास टप्प्याटप्प्याने एक लाखाचा निधी जाहीर केला. महिलांना एसटी बसमध्ये 50 टक्के सवलत, एसटी बसमध्ये ज्येष्ठांना मोफत प्रवास यासह विविध नवीन योजना व निर्णय सरकारने घेतले आहेत, असे फडणवीस म्हणाले.

जनतेच्या हितासाठी निर्णय

निर्णय थांबवणारे आमचे सरकार नाही. जनतेच्या हितासाठी आम्ही निर्णय घेतो, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Back to top button