सोलापूर : ऑर्किडच्या भावी अभियंत्यांची विमाननिर्मिती | पुढारी

सोलापूर : ऑर्किडच्या भावी अभियंत्यांची विमाननिर्मिती

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा जगात सध्या कोरोना महामारीमुळे शिक्षण क्षेत्र पूर्णपणे बंद असताना ऑर्किड महाविद्यालयातील 20 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वर्षभर परिश्रमातून एक रिमोट कंट्रोल विमान तयार केले आहे. महाविद्यालय परिसरात आपल्या पालक व शिक्षकांचा साक्षीने त्याला आकाशात उंच भरारी देत ऑर्किडच्या भावी अभियंत्यांनी विमाननिर्मिती गगनभरारी घेतली.

सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑर्किडच्या विद्यार्थ्यांनी 6 फूट फ्यूज लार्ज व 6.5 लांबीचे पंख असलेले विमान रिमोट कंट्रोलने आकाशात झेपावत त्याची सेफ लँडिंगही करून दाखविली. विशेष म्हणजे प्रथम वर्ष मेकॅनिकल व इतर विभागांतून एकत्र येऊन विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली. वर्षभर त्यांना मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास एस. मेतन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रोजेक्टचे बरेचसे काम त्यांनी आपल्या घरी, कधी सरांच्या घरी, तर कधी महाविद्यालयात पूर्ण केले. फ्लाईट टेस्टिंग परीक्षणार्थ विद्यार्थ्यांना उमेश नेवसे यांचे मार्गदर्शन लाभले. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे पुढील वर्षी ‘टू सिटर एअर क्रॉफ्ट’ बनविण्याच्या व सोलार ऑपरेटेड एअर क्रॉफ्ट तयार करण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग भरारीचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार, सर्व ट्रस्टी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले. सध्या हा प्रोजेक्ट पहिल्या टप्प्यात आहे. ज्यामध्ये रिमोटवर चालणारा एअरक्राफ्ट विद्यार्थ्यांनी डिझाईन, डेव्हलप करून त्याचे यशस्वी उडाण केले. भविष्यात विजेवर चालणार्‍या एअरक्राफ्टची निर्मिती करणे, असा ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यायातील मेकॅनिकल विभागाचा मानस आहे. अशा प्रयोगातून आपण जर्मनी व इतर युरोपियन देशात अभियांत्रिकी शिक्षणात राबविली जाणारी स्कील बेस्ड व प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगची संकल्पना अंमलात आणत आहोत, असे मत प्रोजेक्ट गाईड डॉ. श्रीनिवास एस. मेतन यांनी व्यक्त केले.

विमान तयार करणारे विद्यार्थी

ऋषिकेश मराठे, प्रतिमा गोफणे, आदित्य मेतन, ओंकार मराठे, मयूर काटगावकर, निकिता थोरात, रोहन सावंत, विनीत कांबळे, प्रणव मोंढे, विपुल वाघमोडे, वनशिका पाटील, आयुषा होमकर, समर्थ पवार, तुषार गुमटे, जयशंकर डोंगे, नागेश सदलापूरकर, प्रथमेश बुगडे, हर्षद बिदरकर, रोहित खरात, विशाल मसणे व मार्गदर्शक डॉ. श्रीनिवास एस. मेतन.

Back to top button