Solapur Water shortage: अजूनही ५२ हजार लोक तहानलेलेच

ऐन पावसाळ्यात२० गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
Solapur Water shortage: अजूनही ५२ हजार लोक तहानलेलेच
Published on
Updated on

सोलापूर : पावसाळा सुरु होऊन सव्वा महिना उलटून गेला तरी अद्याप पावसाने दडीच मारलेली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने भूजलपातळीत घट झाल्याने अनेक पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. ऐन पावसाळ्यातही जिल्ह्यातील ५२ हजार लोकांना टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

यंदा एल निनो संकटाचे परिणाम जाणवत आहेत. गेल्यावर्षी १२ जूनपासूनच सुरू झालेल्या पावसाने हाहाकार माजवला होता. परंतु यंदा जुलै महिना उजाडला तरी पावसाची प्रतिक्षाच आहे. त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती गडद होत चालली आहे. सध्या जिल्ह्यातील २० गावे आणि ११३ वाड्या-वस्त्यांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १७ विहिरी आणि ३ बोअरचे अधिग्रहण केले आहे. पाण्याची पातळी झपाट्याने खालावल्याने उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, माळशिरस, अक्कलकोट, बार्शी आणि माढा तालुक्यांना सर्वाधिक फटका बसत आहे.

माळशिरस तालुक्यात सर्वाधिक १० टँकर असून, सांगोला तालुक्यात ७ टँकर आहेत. टँकरच्या पाण्यावर तब्बल ५२ हजारांहून अधिक नागरिक आणि १ लाख ४३ हजार जनावरे अवलंबून आहेत. पाणीपातळी घटल्याने बार्शी तालुक्यात ६ विहिरी व ३ बोअर, माढा तालुक्यात १ विहीर, तर माळशिरस तालुक्यात १० विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील अनेक मध्यम आणि लहान तलावाने तळ गाठला आहे. त्याचा फटका शेती आणि पिण्याच्या पाण्याला बसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news