भीमा नदीपात्रात चौघांचा बुडून मृत्यू; मंगळवेढा तालुक्‍यातील घटना | पुढारी

भीमा नदीपात्रात चौघांचा बुडून मृत्यू; मंगळवेढा तालुक्‍यातील घटना

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भीमा नदीपात्रात बुडून दोन महिला व दोन चिमुकल्यांचा मृत्‍यू झाला. ही दुर्घटना गुरुवीरी (दि. १३ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

बालूदमाई करणसिंग नेपाळी (वय, ३५), मनसरादमाई महेंद्रसिंग नेपाळी (वय, ३३), हिरदेश महेंद्रसिंग नेपाळी (८), नमुना करणसिंग नेपाळी (वय ११, सर्व मूळ रा. जम्बुकांध, ता. जि. द्रेलेख, राज्य, कर्णाली प्रदेश, नेपाळ) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे समोर आली आहेत. नेपाळमधील गुरखे उदरनिर्वाहासाठी सिद्धापूरमध्ये सहा दिवसांपूर्वी आले होते. गावात भाड्याने घर घेऊन ही दोन कुटुंबे राहत होती. दुपारी कुटुंबातील महिला लहान मुलांना घेऊन कपडे धुण्यासाठी जिल्हा परिषद शाळेमागे गेले गेल्या. कपडे धुतल्यानंतर लहान मुलाने अचानक पाण्यात उडी मारली. पाण्याचा अंदाज नसल्याने तो बुडाला. त्याला वाचवण्यासाठी बालूदमाईने पाण्यात उडी घेतली. नंतर मुलीने व दुसऱ्या महिलेनेही उडी घेतली. सर्व जण लागोपाठ बुडाले. घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच पोलीस पाटलांनी तत्‍काळ मंगळवेढा पोलिसांना कळवले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी घटनास्थळी येऊन गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवले होते. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे करत आहेत.

Back to top button