सोलापुरात महाविकास आघाडीची सभा मे महिन्यात | पुढारी

सोलापुरात महाविकास आघाडीची सभा मे महिन्यात

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या संदर्भात राष्ट्रवादीची बैठक नुकतीच पार पडली. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात ही राबविण्यात येणार आहे. सध्या राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर भाजप आणि शिवसेनेने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीने आगामी निवडणुका लढण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने राज्यात हालचाली वाढल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीची बैठक पार पडली.

यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे तसेच कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी अबाधित ठेवून निवडणुका लढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याची चर्चा झाली. तसेच यावेळी लवकरच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांची महासभा मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यात घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उमेश पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील राजकारणाला दिशा देण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग सर्वच निवडणुकांमध्ये यशस्वी करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच लवकरच महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. तसेच या बैठकीत मे मध्ये होणाऱ्या महासभेचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीस राष्ट्रवादीचे सर्व तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा सरचिटणीस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का

Back to top button