

सोलापूर : राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्या वतीने केंद्र शासन विश्वकर्मा या महत्त्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी शहर जिल्ह्यातील बँकांना 548 प्रस्ताव दिले होते. मात्र, प्रत्यक्षात 489 प्रस्तावकांचे प्रकरण मंजूर केले आहेत. या प्रस्तावकांना पारंपरिक उद्योगांना पाठबळ मिळाले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडून केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेली विश्वकर्मा ही महत्त्वपूर्ण योजना आहे. ही योजना ग्रामीण भागातील पारंपरिक उद्योगांना बळ देण्यासाठी राबवण्यात येत आहे. या योजनेतील कर्ज धारकांना अत्यंत कमी व्याजदर पाच टक्के (5 टक्के) आणि विविध व्यवसायासाठी लागणारे संच खरेदीसाठी (टूलकिट) मदतही दिली जाते.
ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसायातील कारागिरांना आर्थिक मदत दिली जात असून तांत्रिक आणि कौशल्य विकासासाठी सहकार्य केली जाते. डिजिटल व्यवहार व आधुनिक अवजारांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन देणे.
तीन लाखांपर्यंत कर्ज
सोनार, पादत्राणे बनवणे, सुतार, लोहार, कुंभार, शिंपी, सोनार, नाभिक, गवंडी, मोची, मासेमारीची जाळी बनवणारे, टोपली, चटई, झाडू बनवणारे, बाहुली आणि खेळणी बनवणारे, माळी (फुलांचे हार बनवणारे), धोबी, तसेच शिल्पकार आणि दगड कोरणारे यांसारख्या पारंपरिक कारागिरांना त्यांच्या व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत कर्ज मिळते. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांनी आतापर्यंत आर्थिक प्रगती साधली आहे. ही योजना संबंधितांसाठी आर्थिक स्थैर्य आणणारी आहे.