सामूहिक अत्याचार प्रकरण : पोलीस अधिकारींना पूर्व-निर्धारित तपासाबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश | पुढारी

सामूहिक अत्याचार प्रकरण : पोलीस अधिकारींना पूर्व-निर्धारित तपासाबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी गणेश कैलास नरळे आणि विष्णू चंद्रकांत बरगंडे यांना गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रकार पोलिसांनी केल्याबद्दल पीडित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, सध्याचे तपास अधिकारी तथा सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पूर्वीचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांनी प्रकरणाबाबत केलेल्या पूर्व-निर्धारित त्रुटीबाबत काय तपास केला, याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

आरोपी गणेश नरळे (वय २९) आणि विष्णू बरगंडे (वय ४०, रा. आवसे वस्ती, सोलापूर) यांच्या विरूध्द एका तरूणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. परंतु पूर्वीचे तपास अधिकारी विष्णू गायकवाड यांनी आरोपी विष्णू बरगंडे याच्या विरुद्ध पुरावा मिळून आला नसल्याचे नमूद करीत त्याला दोषारोप पत्रातून वगळले होते. तर आरोपी गणेश नरळे याच्या विरुद्ध किरकोळ फसवणुकीच्या गुन्ह्या अंतर्गत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यामुळे व्यथित झालेल्या पीडितेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात तपास अधिकारी बदलून अन्य तपास अधिकाऱ्याकडे तपास हस्तांतर करावा व प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास करावा, अशी विनंती पीडितेने केली होती.

दरम्यान सध्याचे तपास अधिकारी पोलीस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे यांनी गुन्ह्याकामी आरोपी विष्णू बरगंडे यास अटक केली व केलेल्या तपासाबाबत प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केले. त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सुनील बी. शुक्रे व न्या. अभय एस. वाघवसे यांनी तपास अधिकाऱ्यास प्रतिज्ञापत्राद्वारे पूर्वीचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांनी तपासात केलेल्या पूर्व-निर्धारित त्रुटींबद्दल कोणत्या प्रकारचा तपास केला ? कोणत्या प्रकारची कारवाई सुरू केली, याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र येत्या ६ एप्रिलपर्यंत दाखल करण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी पीडितेतर्फे ॲड. विक्रांत फताटे व ॲड. प्रशांत नवगिरे तर सरकारतर्फे ॲड. कोंडे-देशमुख हे काम पाहत आहेत.

Back to top button