Solapur : चंदन घेऊन जाणाऱ्या टेम्पोसह ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मोहोळ पोलिसांची कारवाई | पुढारी

Solapur : चंदन घेऊन जाणाऱ्या टेम्पोसह ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मोहोळ पोलिसांची कारवाई

पापरी; पुढारी वृत्तसेवा : मोहोळ पोलिसांनी अवैधरित्या चंदन घेऊन जाणाऱ्या टेम्पोसह ३१ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल रविवारी (दि. १३) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी फाट्या जवळ करण्यात आली. मात्र ही कारवाई करताना सबंधितांना पोलीस आता आपल्याला पकडणार हे ध्यानी येताच वेडी वाकडी गाडी चालवत ती पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी रस्त्याच्या कडेला उड्या मारत आपला जीव वाचविला.

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोमधून (क्र एम एच 04 जीएफ 1988) वाफळे (ता. मोहोळ) येथून चंदनाची लाकडे घेऊन  हे चंदन घेऊन निघाले होते. श्रीकृष्ण बिनु दाढे, शंकर दाढे (रा. वाफळे) व चालक विनोद खडूळ हे तीघे जण हा टेम्पो घेऊन जात होते. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक वाफळेकडे रवाना झाले. कर्मचाऱ्यांनी देवडी फाट्यावर पहाटे पावणे चार वाजता सापळा रचला. वाफळे गावाकडून एक टेम्पो वेगात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी टेम्पोला थांबण्याचा इशारा केला, मात्र चालकाने टेम्पो वेडा वाकडा व भरधाव चालवून रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला उड्या मारून आपला जीव वाचविला आणि नंतर ताबडतोब वाहनाचा पाठलाग सुरू केला. टेम्पो चालकाने टेम्पो तेलंगवाडी ता मोहोळकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला घातला आणि अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले. वाहन पोलिसांनी तपासले असता त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यात ३०७ किलो चंदनाची १५ लाख ३८ हजार ७५० रुपयाची लाकडे आढळून आली. पोलिसांनी टेम्पो सह ३१ लाख ३८ हजार ७५० रुपयाचा माल ताब्यात घेतला. या घटनेची नोंद मोहोळ पोलीसात करण्यात आली असुन तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.

Back to top button