825 किलो कांदा विकला अन् पदरचाच रुपया द्यावा लागला व्यापार्‍याला; कवडीमोल दरामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू | पुढारी

825 किलो कांदा विकला अन् पदरचाच रुपया द्यावा लागला व्यापार्‍याला; कवडीमोल दरामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन महिन्यांपासून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील दाऊतपूर येथील बंडू भांगे या शेतकर्‍याने एस. एन. जावळे या व्यापार्‍यास 825 किलो कांदा विकला. हमाली, तोलाई, गाडी भाडे याचे सर्व पैसे वजा केल्यानंतर उलट शेतकर्‍याचे व्यापार्‍यास एक रुपयाचे देणे झाले. त्यामुळे शेतकर्‍याला त्या व्यापार्‍यास पदरचा एक रुपया देऊन माघारी परतावे लागले.

बंडू भांगे यांनी सोलापूर कृषी बाजार समितीत 825 किलो कांदा विकला. या कांद्याला प्रतिक्विंटल 100 रुपये दर मिळाला. म्हणजेच 825 किलो कांद्याची एकूण रक्कम 825 रुपये झाली. 65.18 रुपये हमाली, तोलाई 38.78 रुपये, इतर हमाली 25.50 रुपये, मोटार भाडे 697 रुपये असा एकूण 826 रुपये खर्च झाला. त्यामुळे शेतकर्‍याला उलट व्यापार्‍याला एक रुपया द्यावा लागला आणि रिकाम्या हाती परतावे लागले. या व्यवहाराच्या बिलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

किरकोळ बाजारात आजदेखील कांदा 15 ते 20 रुपये दराने विकला जात आहे. परंतु, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी एक, दोन रुपये प्रतिकिलोने कांद्याचा लिलाव करत शेतकरीवर्गाची थट्टा करत आहेत. सरकारने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल 500 रुपये अनुदान द्यावे. राज्य शासनाने त्वरित शेतकर्‍यांना अनुदान देण्याची व्यवस्था करावी; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा सोलापूर शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिला.

आवक वाढल्याने दरात घसरण

कांद्याला मागील दोन वर्षांत मिळालेल्या उच्चांकी दरामुळे कांद्याच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी, यंदा कांद्याच्या उत्पादनात विक्रमी वाढ होऊन बाजारातील आवकही वाढली. त्यातुलनेत मागणी कमी असल्याने बाजारात कांद्याचे दर कोसळले. घाऊक बाजारात कांद्याला प्रतिकिलो 3 ते 13 रुपये, तर किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये किलो दर मिळत आहे.

Back to top button