इंद्रायणी एक्सप्रेस तब्बल चार तास उशिरा पोहोचली पुण्यात; रेल्वेचा मेगा ब्लॉकचा प्रवाशांना नाहक त्रास | पुढारी

इंद्रायणी एक्सप्रेस तब्बल चार तास उशिरा पोहोचली पुण्यात; रेल्वेचा मेगा ब्लॉकचा प्रवाशांना नाहक त्रास

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर विभागातील जेऊर ते दौंड सेक्शन दरम्यान रेल्वेच्या विविध प्रकारच्या कामासाठी तीन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. याची प्रवाशांना कसलीच कल्पना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती. यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेस सह अनेक गाड्या उशिरा धावत होत्या. रेल्वेच्या मनमानी कारभारामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

सोलापूर विभागातील दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असताना देखील अनेक वेळा या मार्गावर गाड्यांना वेळेत पोहोचण्यास विलंब होत आहे. असाच काहीसा प्रकार बुधवारी (दि. 8) फेब्रुवारी बुधवार रोजी इंद्रायणी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12 170) ही गाडी सोलापूर स्थानकातून दुपारी दोन वाजता पुण्याच्या दिशेने रवाना झाली. परंतु ही कुरूडवाडी रेल्वे स्थानकावर दोन वाजून 47 मिनिटांनी येणे अपेक्षित होते परंतु पाच वाजून तेरा मिनिटाला पोहोचली. जेऊर रेल्वे स्थानकावर तीन वाजून 18 मिनिटाला पोहोचणे अपेक्षित होते परंतु सायंकाळी सहा वाजून 25 मिनिटाला पोचली. तर दौंड स्थानकावर रात्री आठ वाजून पंधरा मिनिटाला पोहोचली. ही गाडी पुणे स्थानकात सायंकाळी सहा वाजता पोहोचणे अपेक्षित होते परंतु तब्बल साडेतीन तास उशिरा या गाडीने रात्री नऊ वाजता पुणे स्थानक गाठले. पुणे सोलापूर या चार तासाच्या प्रवासाला आठ तासाचा अवधी लागल्याने गाडीतील प्रवासी पुरते हाताश झाले होते. पुणे स्थानकातून प्रवाशाच्या नातलगांकडून गाडी का पोहोचली नाही याबाबत विचारणा होत होती. रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर प्रवासीसह प्रवासी संघटनांनी जोरदार संताप व्यक्त केला.

वाशिंबे ते पोफळज दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या अपडेट साठी दुपारी 2 वाजून चाळीस मिनिट ते सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटाचा या चार तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. याकरता गाडी वेळेत पोहोचण्यास विलंब झाला.
लक्ष्मण रणयेवले,
वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक, सोलापूर विभाग

रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक घेण्याआधी सोलापूर विभागातील प्रसारमाध्यमांना तसेच प्रवाशांना याची कल्पना देणे अपेक्षित होते पण असे न करता रेल्वेने मेगाब्लॉक घेतल्याने अनेक प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
राजेंद्र कांबळे, रेल्वे प्रवासी संघटना

Back to top button