सोलापूर : लाचेची मागणी करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील एकाला अटक | पुढारी

सोलापूर : लाचेची मागणी करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील एकाला अटक

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : दारूबंदी कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी सहकार्य करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्‍या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील जवानास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई (सोमवारी) सायंकाळी करण्यात आली. यावेळी त्‍याला ताब्‍यात घेऊन विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मलंग गुलाब तांबोळी (वय 33), रा. प्रकाश नालवार यांचे स्वामी विवेकानंद नगर, ओम गर्जना चौक, सैफुल, सोलापूर येथे घर आहे. या ठिकाणी ते भाड्याने राहतात. तर ब्लॉक नंबर 58, अश्विनी कॉलनी, एस. आर. पी एफ ग्रुप १० जवळ, विजापूर रोड, सोलापूर येथे त्‍यांचे स्‍वत:चे घर आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदाराविरुद्ध ऑक्टोबर 2022 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर येथे दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांना जामीन मिळविण्याच्या अनुषंगाने सहकार्य केल्याचा मोबदला म्हणून भरारी पथकातील जवान मलंग तांबोळी यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान तडजोडी अंतिम २० हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने तपासणी व चौकशी केल्यानंतर मलंग तांबोळी यांनी २० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्पूर्वी मलंग तांबोळी यास ताब्यात घेताना तांबोळी याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कर्मचारी जखमी झाला असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई उपाधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस नाईक प्रमोद पकाले, अतुल घाडगे, उमेश पवार, स्वप्निल सन्नके, उडाणशिव यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button