

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या एकवीस बालगृहात 398 बालके राहतात. शासनाच्या महिला बालकल्याण विभागाकडून प्रति बालकास पोषणासाठी चार हजार रूपयांचे अनुदान मिळते. साधारण जिल्ह्याला पावणे दोन कोटींचा निधी वितरित केला जातो.
शहरासह जिल्ह्यात यापूर्वी बालगृहांची संख्या मोठ्या प्रमाणावर होते. या बालगृहाबाबत केंद्र व राज्य शासनाकडून बाल न्याय अधिनियमात बालकांची काळजी व संरक्षणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणीची अट घातली आहे. यामुळे, अनेक संस्थांनी स्वतः हूनच बालगृह बंद केली आहेत. ज्या संस्थांनी बालन्याय अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी केलेली आहे अशी शहरासह बार्शी, किणी, पंढरपूर आणि करमाळा आदी ठिकाणी एकवीस बालगृहे आहेत. या बालगृहात सहा ते अठरा वयोगटातील मुलांनाच प्रवेश दिला जातो.
बालगृहात राहणारी मुले ज्या त्या परिसरातील शाळांमध्ये प्रवेश घेतात. शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या अनुदानित बालगृहांना बालकांच्या परिपोषणासाठी अनुदान मिळते. सर्वाधिक बालगृहांची संख्या ही सोलापूर शहरात आहेत. 398 बालकांच्या परिपोषणासाठी शासनाकडून दरमहा पंधरा लाख 92 हजार रूपयेचे अनुदान मिळते. तर वर्षाकाठी एक कोटी 91 लाख 4 हजार रुपये सोलापुरातील या बालगृहांना मिळतात. यात त्या बालकांंना कॉट, गादी, अथरूण, पांघरूण या सुविधा देणे बंधनकारक आहे. तसेच, जेवणासह कपड्यांसाठी आणि संस्थेच्या प्रशासनाने नेमलेले कर्मचारी यांच्या वेतनासह इमारतीच्या भाड्यासह सर्व खर्चासह चार हजार रुपये इतकी रक्कम संस्थेला अदा केली जाते.