पंढरपूर : कार्तिकी वारीसाठी नगरपालिका प्रशासन सज्ज: १३४८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती | पुढारी

पंढरपूर : कार्तिकी वारीसाठी नगरपालिका प्रशासन सज्ज: १३४८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : कार्तिक शुद्ध एकादशी 4 नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. यात्रेत भाविकांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. 1348 कर्मचारी स्वच्छतेसाठी राबणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

कार्तिकी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र, वाळवंट, 65 एकर परिसर, पत्रा शेड, दर्शन बारी आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी 1348 स्वच्छता कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये 348 कायम तर 1000 हंगामी कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत. भाविकांना स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी शहरातील सार्वजनिक बोरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी तसेच खासगी विहिरींचे क्लोरीनेशन करण्यात आले आहे. शहरासह 65 एकर, वाळवंट, पत्राशेड आदी ठिकाणी जंतनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या, कॉम्पॅक्टर, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी आदी वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पत्राशेड, वाळवंट 65 एकर परिसर, रेल्वे मैदान या आवश्यक ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात येणार आहेत. वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये, म्हणून प्रतिबंधक पथकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे.

शहरातील सर्व प्रमुख रस्त्यासह प्रदक्षिणा मार्ग, दर्शन बारी येथील लाईट दुरुस्तीचे काम सुरु आहे. काही ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच 65 एकर येथे अखंडित व पुरेसा प्रकाश मिळावा, यासाठी 16 मीटर उंचीचे 6 हायमास्ट दिवे व 160 लॅम्प चालू करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक शौचलयातही लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीपात्र येथे 20 मीटर उंचीचे 9 हायमास्ट दिवे चालू केले आहेत. सर्व घाटांवर तसेच पत्राशेड व वाहनतळ येथेही लाईट व्यवस्था करण्यात येत आहे.

धोकादायक इमारतींना नोटीसा

सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील जीर्ण व धोकादायक 150 इमारतींना नोटीसा देण्यात आल्या आहेत. शहरातील व वाळवंटातील अतिक्रमणे काढण्यासाठीत पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरु आहे. आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्यात आले आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button