सोलापूर : पालकमंत्री विखे पाटील येण्यापूर्वीच राष्‍ट्रवादीने पुतळा सुशोभिकरणाचे केले उद्घाटन | पुढारी

सोलापूर : पालकमंत्री विखे पाटील येण्यापूर्वीच राष्‍ट्रवादीने पुतळा सुशोभिकरणाचे केले उद्घाटन

सोलापूर; प्रतिनिधी : नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते चार हुतात्मा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसराचे सुशोभीकरण होणार होते, परंतु हा वाद आता चांगलाच पेटला आहे. माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकाळात सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली आणि तात्कालीन पालकमंत्री भरणे यांनी एक कोटी रुपये निधी सुशोभीकरणासाठी मंजूर केला होता. परंतु सत्तांतर झाल्यानंतर आज नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्यांदाच सोलापुरात येणार होते. त्यांच्या हस्ते चार हुतात्मा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परिसराचे सुशोभीकरण कामाचे उद्घाटन करण्यात येणार होते. परंतु त्या अगोदरच राष्ट्रवादी आणि धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीने उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यात हा सुशोभीकरण कामाचा शुभारंभ होणार होता. परंतु ज्या माजी दत्तात्रय भरणे यांनी निधी मंजूर केला त्या कामाचे उद्घाटन भाजपचे पालकमंत्री करत असून, याचे सर्व श्रेय नूतन पालकमंत्री घेत आहेत असा आरोप राष्‍ट्रवादीकडून करण्यात आला आहे. हा परिसर सुशोभीकरण व्हावा यासाठी सर्व पक्षाचे राजकीय नेते, धनगर समाज बांधव यांनी तात्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.

त्यानुसार माजी पालकमंत्री भरणे यांनी सदर कामासाठी निधी मंजूर केला होता. परंतु या कामाचे उदघाटन करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रोटोकॉल पाळले गेले नाहीत. आज होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत चार हुतात्म्यांच्या वारसदारांचे देखील नाव नाही. आजच्या उदघाटन कार्यक्रमाला पुरातत्व खात्याची परवानगी घेतली आहे का, याबाबत भाजप हे प्रशासनावर दबाव आणून काम करून घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर आणि धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी केला.

यावेळी दीपक राजगे, चंद्रकांत पवार, ज्योतिबा गुंड, बसू कोळी, लखन गावडे, बिरप्पा बंडगर, विपुल केसकर, अक्षय बचुटे, सोपान खांडेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि धनगर समाज बांधव उपस्थित होते.

हेही वाचा :  

Back to top button