सोलापूर : १५ हजारांची लाच घेताना ‘महावितरण’च्या अभियंत्याला अटक | पुढारी

सोलापूर : १५ हजारांची लाच घेताना 'महावितरण'च्या अभियंत्याला अटक

माळशिरस : पुढारी वृत्तसेवा: शेतातील विद्युत डीपीचे बिल माफ करण्यासाठी १५ हजाराची लाच घेताना महावितरण कंपनीचे सदाशिवनगर शाखेचे कनिष्ठ अभियंता सुमित गुलाबराव साबळे (वय २७) याला रंगेहाथ पकडण्‍यात आले. ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (दि. २७) केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमित गुलाबराव साबळे महावितरण कंपनीची शाखा सदाशिवनगर येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार शेतकरी यांनी त्यांच्या शेतामध्ये वैयक्तिक डीपी बसविला आहे. त्यास २५ मार्च २०२२ रोजी महावितरण कार्यालयाकडून चार्जिंग परवानगी मिळाली होती. तेव्हापासून डीपी चालू झालेला होता. परंतु त्यास मीटर बसविले नसल्याने तक्रारदार यांना अद्यापपर्यंत कोणतेही वीज बील आलेले नव्हते.

त्यानंतर सुमित साबळे यांनी तक्रारदार यास मीटर बसविण्यास सांगितले. तसेच आजपर्यंत वीज वापरल्याचे कोणतेही बील न आकारण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदाशिवनगर येथे सापळा लावून साबळे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पुणे विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अमलदार घाडगे, सनके, किनगी, उडांनशिव यांनी केली.

हेही वाचा :  

Back to top button