पंढरपूर : अभिजीत पाटील भाजपात येतील | पुढारी

पंढरपूर : अभिजीत पाटील भाजपात येतील

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा एखादा मराठा उद्योजक पुढे येत असेल तर त्याला पाठबळ दिले पाहिजे. उद्योजक अभिजीत पाटील चांगले उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. अडचणीच्या काळात त्यांना दूर करणे चुकीचे आहे. भाजपमध्ये सध्या सर्वजणच येत आहेत. उद्योजक अभिजीत पाटीलही येतील. ते माझे चांगले मित्र आहेत, असा दावा भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी पंढरपुरात केला. दरम्यान, आयकर विभाग त्यांची चौकशी करेल; पण कर नसेल त्याला डर कशाला? असे असेही दरेकर म्हणाले.

आ. दरेकर हे पंढरपूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत होते. दरेकर म्हणाले, ईडीच्या अटकेत असलेले खा. संजय राऊत यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून एकही काळजी करणारे वक्तव्य देण्यात आलेले नाही. खा. राऊत हे शिवसेनेचे नेते नव्हेतच, इतका विसर ठाकरे यांना पडला आहे. त्यामुळे खा. राऊत यांना ठाकरेंनी वार्‍यावर सोडले आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही खा. राऊत यांच्याबाबत भाष्य केले नसल्याचे दरेकर यांनी लक्ष वेधले.

संभाजी ब्रिगेडशी युती म्हणजे ‘बुडत्याला काडीचा आधार…’

शिवसेना व संभाजी ब्रिगेडच्या युतीवर टीका करताना आ. दरेकर म्हणाले, सध्या उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच राहिलेले नाही. त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार कसा लागतो. त्याप्रमाणे मिळेल तो आधार घेण्याचा ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. पण ज्यांनी सावरकरांवर टीका केली, ज्यांनी छत्रपतींच्या व इतर संदर्भात वादग्रस्त भूमिका घेतल्या, त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका शिवसेनेने घेतली. यासारखे दुसरे दुर्दैव नसल्याचे आ. दरेकर म्हणाले.

Back to top button