

सिद्धार्थ ढवळे
पंढरपूर :
जातां पंढरीस सुख वाटे जीवा।
आनंदें केशवा भेटतांचि॥१॥
या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं।
पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे॥२॥
असे हृद्य स्वर म्हणत चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा करत लाखो भाविकांच्या हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरीनगरी दुमदुमली. आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्याला सुमारे ३० लाख भाविकांनी उपस्थिती दर्शवत एकादशी सोहळा साजरा झाला. यामुळे पंढरीनगरी वैष्णवमय झाली आहे. मठ, मंदिर, संस्थाने, ६५ एकर येथील भक्तिसागरातील तंबू, राहुट्यांमधून भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग आहेत. पंढरीत भाविकांचा, वैष्णवांचा मेळा भरल्याचे चित्र दिसून येत आहे.
मानाच्या पालख्यांसह विविध संतांच्या पालख्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक आषाढी यात्रा एकादशीच्या मुख्य सोहळ्याला पंढरीत आले. भाविकांमुळे मठ, मंदिरे, धार्मिक शाळा, संस्थाने गजबजून गेली आहेत. ६५ एकर येथील भक्तिसागर, रेल्वे मैदान, टाकळी बायपास रोड, उपनगरीय भागातही भाविक राहुट्या, तंबू उभारून वास्तव्य करत आहेत. भजन, कीर्तन, प्रवचनात महाराज मंडळी, तर ऐकण्यात भाविक दंग झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने पंढरपूर येथे भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. असंख्य भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नानानंतर मुखदर्शन व कळस दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तितकीच गर्दी रांगेत उभारून पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी झाली आहे. मंदिर समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या २० दर्शन शेड व २० कि.मी. दूर गेलेल्या दर्शन रांगेत एकादशीदिवशी सुमारे चार लाख भाविक प्रतीक्षा करत होते. दर्शन रांग पत्राशेडच्या बाहेर पडून गोपाळपूरगावाच्या पुढे स्वेरी कॉलेजपर्यंत दाखल झाली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना दर्शन मिळण्यास सुमारे २० ते २२ तासांचा अवधी लागत असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.
आषाढी यात्रा एकादशीसाठी आलेल्या वारकर्यांची पहाटेपासूनच चंद्रभागा नदीत स्नानासाठी गर्दी झाली होती. स्नानानंतर दर्शन घेऊन भाविक प्रसाद, कुंकू-बुक्का, अगरबत्ती खरेदीकडे वळत असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे मंदिर परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजून गेली. प्रासादिक साहित्याची विक्री जास्त होताना दिसून येत आहे. एकादशी, द्वादशी तसेच गोपाळकाल्यापर्यंत बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची शक्यता स्थानिक व्यापार्यांकडून वर्तवली जात आहे. आषाढी यात्रेत चोर्या रोखण्यासाठी दामिनी पथक तैनात होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री महापूजेला आल्याने विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली होती. सुमारे दहा हजार अधिकारी व पोलिस कर्मचारी यात्रेकरिता तैनात करण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी आपत्कालीन विभाग कार्यरत ठेवला होता. भाविकांना काही अडचण आल्यास त्वरित संपर्क करता येत आहे. आरोग्य कर्मचारी, आरोग्य पथके तैनात असल्याने वेळीच भाविकांना औषधोपचार करण्यात येत आहेत. आषाढी यात्रेकरिता यंदा विशेष रेल्वे गाड्या पंढरपूरपर्यंत सोडण्यात आल्या आहेत. सुमारे पाच हजार पाचशे एस.टी. बसेस भाविकांच्या सेवेकरिता धावत आहेत. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत योजना असल्यामुळे महिला भाविकांची संख्या जास्त दिसून येत आहे. चंद्रभागा बसस्थानकासह शहराबाहेर तात्पुरती चार बसस्थानके तयार करण्यात आली असून, त्या त्या विभागाकडे बसेस मार्गस्थ करण्यात येत आहेत.