

सोलापूर : जिल्हा क्षयरोग विभागाकडून सन 2024-25 मध्ये जिल्हाभरात संशयित रुग्णांची तपासणी केली. यात 3 हजार 330 क्षयरोग रुग्ण आढळून आले असून, यातील 2 हजार 896 रुग्ण क्षयरोग मुक्त झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 460 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्याचे उद्दिष्ट दिले असताना मागील वर्षी दोन हजार 896 रुग्णांवर उपचार करून त्यांना क्षयरोगमुक्त केले असल्याची नोंद जिल्हा क्षयरोग विभागात झाली आहे. एमडीआर म्हणजे ड्रग रेझिस्टंट म्हणजेच औषधांना प्रतिसाद न देणारा आजार. एमडीआर म्हणजे मल्टी ड्रग्ज रेसिस्टंट म्हणजे क्षयरोगासाठी वापरण्यात येणार्या आपसोनियाझइड व रिफॅपिझीन ही दोन्ही औषधे व त्यापेक्षा जास्त औषधांना प्रतिसाद न देणारे 50 क्षयरोगी आढळून आले.
जिल्ह्यात 199 ग्रामपंचायती टीबीमुक्त घोषित
टीबीमुक्त भारत योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात क्षयरोग विभागाकडून देण्यात येणार्या उपाययोजनांनुसार जिल्हा व तालुकापातळीवर सर्व्हे करून जिल्ह्यातील 199 ग्रामपंचायतींना टीबीमुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित केले आहे.
क्षयरोगाचे निदान सरकारी रुग्णालयात मोफत
क्षयरोगग्रस्तांना तत्काळ उपचार करता यावा, यासाठी सीबीएनएएटी व सीबी नॉट तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. या रुग्ण एमडीआर आहे की नाही, याविषयी समजण्यास मदत होते. त्यामुळे क्षयरोगाची व्याप्ती समजत असल्याने वेळीच उपचार करण्यास मदत होत असते. त्यातच सोलापूर शहरात 874 रुग्ण क्षयरोगी आढळून आले, तर जिल्ह्यातून अति क्षयरोगी (एमडीआर) चे 50 रुग्ण आढळून आले.
अशी आहेत क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, हलकासा परंतु रात्री येणारा ताप, वजनामध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त घट, भूक कमी होणे, थुकीतून रक्त पडणे, थोडेसे चालले तरी थकवा येणे, छातीत दुखणे, रात्री येणारा घाम अशी अनेक लक्षणे असून, काही त्रास जाणवत असेल तर तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी.
फूड बास्केटचे वाटप
क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना सहा महिन्यांपर्यंत प्रथिनयुक्त आहार शासनाकडून मोफत दिला जातो. यात सोलापूर जिल्ह्यात 4 हजार 61 फूड बास्केट वाटप केली आहेत. याबाबत मी निक्षयमित्र बनून क्षय रुग्णांना मदत करू शकतात. कोणीही मी निक्षयमित्र बनू शकणार आहे.