पंढरपूर शहर, तालुक्यात दमदार पाऊस | पुढारी

पंढरपूर शहर, तालुक्यात दमदार पाऊस

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा तब्बल दोन महिन्यांनंतर पंढरपूर शहर व परिसरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. याअगोदर जूनपासून एक दोन मंडलात पडला तर पडायचा अन्यथा केवळ आशा दावून गायब व्हायचा. मात्र, गुरुवार दि. 4 रोजी रात्र सुरू झालेला हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस रात्रभर सुरू राहिला. यामुळे जमिनीत चांगली ओल तयार झाली आहे. तर शुक्रवारी दुपारनंतर देखील पावसाचे हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

पंढरपूर तालुक्यात जुनच्या सुरुवातीपासूनच दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अद्यापही विहीरी, ओढे, नाले कोरडे ठाक आहेत. मात्र, अधून-मधून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी काही मंडळात कोसळत होत्या. असा अधून-मधून आलेल्या पावसाची नोंद पंढरपूर तालुक्यात दोनशे मि.मी.च्या वर गेली आहे. पेरणी योग्य व पेरणी झालेल्या पिकांना हा पाऊस चांगला आहे. मात्र, दमदार पाऊस झाला नसल्याने विहिरी, ओढे, नाल्यांना पाणी आलेले नाही.

खरीप हंगामातील 90 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. या पेरणी केलेल्या पिकांना पाण्याची नितांत गरज होती. यातच शुक्रवारी रात्रभर भीज पाऊस पडल्याने पिकांना चांगला फायदा झाला आहे. तर जे शेतकरी पेरणी करण्यासाठी थांबले होते. ते देखील या पावसाच्या ओलीवर पेरणी करण्यासाठी तयारी करू लागले आहेत. शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसाने पंढरपूर शहर मंडलात 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर त्या खालोखाल भंडीशेगाव येथे 37 मिमी व तुंगत मंडलात 21 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वच नऊ मंडलांत दमदार पाऊ झालेला आहे.

5 ऑगस्ट रोजीचे मंडलनिहाय पर्जन्यमान
करकंब- 04 मि.मी., पट कुरोली 13 मि.मी., भंडीशेगाव 37 िमि.मी., भाळवणी- 17 मि.मी., कासेगाव – 11 मि.मी., पंढरपूर-50 मि.मी., तुंगत- 21 मि.मी., चळे- 8.3 मि.मी., पुळुज 05 मि.मी., आजचा एकूण पाऊस 156.3 मि.मी., सरासरी पाऊस 17.36 मि.मी.

Back to top button