सोलापूर-गाणगापूर एसटी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये | पुढारी

सोलापूर-गाणगापूर एसटी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अक्कलकोटजवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करा, असे निर्देश प्रशासनाला मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री महोदय यांनी यांनी दिले.

सायंकाळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गुरूराज कुलकर्णी आणि वर्षा वडगावकर या सोलापूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींशी व्हीडिओ कॉलद्वारे संवाद साधून विचारपूस केली. बरे आहात का…आम्ही सर्व यंत्रणेला सूचना केलेल्या आहेत…. प्रशासन तुमची चांगल्या पद्धतीने काळजी घेईल… कुणीही काळजी करू नका… असा धीर मुख्यमंत्र्यांनी अपघातातील जखमींना दिला. शासन आपल्याला सर्वतोपरी मदत करेल, असाही धीर दिला.

दरम्यान, सकाळी अपघात झाल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी, एसटी महामंडळ व पोलिसांकडून माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या होत्या. बसमध्ये ४२ प्रवासी होते, त्यापैकी ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीपैकी २५ जणांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात, तिघांना अक्कलकोट ग्रामीण, दोघांना खाजगी दवाखान्यात दाखल केले असल्याची माहितीही श्री. शंभरकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी श्री.शंभरकर यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेवून सर्व जखमींची विचारपूस केली. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, डॉ. अग्रजा चिटणीस, डॉ. जयकर, महेश कोठे उपस्थित होते.

जखमी प्रवाशांची नावे : सुजाता पोपट पेडगावकर (वय 45,रा.जामखेड अहमदनगर), गुरुराज लक्ष्मण कुलकर्णी(वय 45 सोलापूर), आनंदीबाई घटने (वय 56 ,रा रामपूर), वर्षा वडगावकर (वय 35 रा सोलापूर), शेखर संजय वडगावकर (वय 47,रा सोलापूर), ओंकार पेडगावकर (वय 16,रा जामखेड,अहमदनगर), जावेद बागवान (वय 33 रा मैंदर्गी ता अक्कलकोट),मल्लया हिरेमठ (वय 60 रा अक्कलकोट), मंगल इरय्या देशमुख(वय 76 ,रा सोलापूर), इरय्या शरणय्या देशमुख (वय 40,रा सोलापूर), शंकर राठोड (वय 35,सोलापूर), शोभा रमेश जाधव (वय 55,रा मुंबई), राहुल रमेश जाधव वय 30,रा मुंबई), रत्नाबाई मडप्पा मडचने (वय 60 वर्ष,रा.नावडग), समीक्षा संगमेश्वर पाटील(वय 14 रा सोलापूर), भाऊसाहेब यादवराव पाटील (वय 50 रा सोलापूर), मीना मुकुंद गायकवाड(वय 48 रा सोलापूर), देविदास परदेशी (वय 50,रा आळंद,जि गुलबर्गा),शशिकांत आंदोडगी (वय 70,रा अक्कलकोट), गणेश हिरजा(वय 19,रा सोलापूर), संगीता संगमेश्वर पाटील (वय 36,रा,जेऊर ता अक्कलकोट), शिवशरण बिराजदार (वय 58 वर्ष ,रा सोलापूर), सलीम हसनकडोंगी(वय 45 ,अक्कलकोट), सुयोग साळुंखे(वय 27 ,सांगली), शशिकांत कटारे (वय 55,रा हसापूर), मंजुषा सूर्यकांत (वय 40 वर्ष,रा नागन सूर ता अक्कलकोट), मंगल रश्मी(वय 60 ,रा सोलापूर), अमृता तानवडे (वय 33 रा पुणे) अशा तीस प्रवाशांची माहिती अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा

Back to top button