अक्कलकोटमध्ये विद्यार्थ्यांना पळवण्याचा प्रयत्न | पुढारी

अक्कलकोटमध्ये विद्यार्थ्यांना पळवण्याचा प्रयत्न

हंजगी : पुढारी वृत्तसेवा पानमंगरुळ (ता. अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन विद्यार्थ्यांना पळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्या बुरखाधारी व्यक्तीने तेथून पळ काढला अन् त्याचा प्रयत्न फसला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेकडे धाव घेतली. गुरुवार, 14 जुलै रोजी दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान दुपारी दीड वाजता जेवणाची सुट्टी झाली होती. जेवणानंतर विद्यार्थी खेळत होते. शिक्षकही जेवण करत होते. शाळेत एक लहान व एक मोठे अशी दोन प्रवेशद्वारे आहेत.

अचानक लहान गेटमधून अंगावर बुरखा घातलेली अनोळखी व्यक्ती शाळा परिसरात आली. त्या व्यक्तीने शाळेत प्रवेश केला आणि इयत्ता दुसरीतील मुलगी आणि इयत्ता तिसरीतील मुलगा या दोघांना फूस लावून पळवण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, या दोन विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करताच बुरखा घातलेल्या व्यक्तीने तेथून पळ काढला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. सध्या पालकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

दिवसाढवळ्या अक्कलकोट तालुक्यात शाळेतून विद्यार्थी पळविण्याचा प्रकार घडल्याने तालुक्यात सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

शाळेच्या परिसरात अनोळखी बुरखा घातलेली व्यक्ती आली. जेवणाच्या सुट्टीत त्याने दोन विद्यार्थ्यांना पळवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेनंतर ग्रामस्थ आणि पोलिस पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे.
– सुभाष मंगरुळे
मुख्याध्यापक, जि.प. प्राथमिक शाळा, पानमंगरुळ.

Back to top button