साेलापूर : अज्ञाताचा खून करुन मृतदेह सांगोल्‍यातील गुणापवाडीत फेकला | पुढारी

साेलापूर : अज्ञाताचा खून करुन मृतदेह सांगोल्‍यातील गुणापवाडीत फेकला

सांगोला : पुढारी वृत्तसेवा : अज्ञात व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून करुन त्‍याचा मृतदेह गुणापवाडी ( ता. सांगोला ) येथे फेकण्‍यात आल्‍याची धक्‍कादायक  घटना बुधवारी (दि.13) सायंकाळी उघडकीस आली.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी, गुणापवाडी सांगली व सोलापूर हद्दीवर नवाळवाडीला जाणा-या रस्त्याच्या डाव्या बाजूला फॉरेस्टमधील चारीत पोत्यामध्ये मृतदेह आढळला. खून झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या मानेवर, पाठीवर, दोन्ही खांद्यामध्ये, बरगडीजवळ, डोक्यात उजव्या बाजूस तसेच गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार करण्‍यात आल्‍याचे निदर्शनास आले.

पुरावे आणि ओळख नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह इथे टाकून देण्यात आला, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. याबाबत पोलीस पाटील श्रीनिवास रमेश वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी गुरुवारी (दि.14) घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना या प्रकरणी तातडीने छडा लावण्याच्या सूचना त्‍यांनी  दिल्या.

Back to top button