रेल्वे विद्युत वाहिनीच्या तांब्याच्या तारा चोरणारी टोळी अटक | पुढारी

रेल्वे विद्युत वाहिनीच्या तांब्याच्या तारा चोरणारी टोळी अटक

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणार्‍या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावरील विद्युत वाहिनीच्या तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई आणि लातूर येथील रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस पथक हे सोलापुरात आले असून या पथकाने या तांब्याच्या तारा विकत घेणार्‍यास ताब्यात घेतले आहे. मारूफ फारूख शेख (रा. सिद्धेश्वर पेठ, लक्ष्मी मार्केटजवळ, सोलापूर) असे तारा विकत घेणार्‍याचे नाव असून त्यास रेल्वे सुरक्षा पोलिसांनी ताब्यात घेऊन लातूर गाठले आहे. यापूर्वी या गुन्ह्यात रमेश काळे, निशिकांत चांदणे (रा. पारधी कॅम्प, उस्मानाबाद) आणि शेख चाँद (रा. उस्मानाबाद) यास या गुन्ह्यात अटक केलेली आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कुर्डूवाडी ते लातूर या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सध्या टप्प्याटप्प्याने सुरू आहे. या मार्गावरील औसा, ढोकी, लातूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी विद्युत वाहिनीच्या तांब्याच्या तारा ओढून ठेवण्यात आलेल्या होत्या, परंतु, विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले नसल्याने त्यातून विद्युत प्रवाह कार्यान्वित करण्यात आलेला नव्हता. 19, 25 आणि 30 जून 2022 रोजी औसा, ढोकी आणि लातूर रेल्वे स्टेशन हद्दीतील विद्युत वाहिनीच्या तांब्यांच्या तारा कापून अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. चोरट्यांनी जवळपास 500 किलो तांब्याच्या तारांची चोरी केली असल्याबाबत लातूर रेल्वे सुरक्षा बलामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मध्ये रेल्वेच्या मुंबई कार्यालयातून या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकं तयार करून पाठविण्यात आले आहे.

रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांसनी या गुन्ह्यांचा तपास करून रमेश काळे, निशिकांत चांदणे आणि चाँद शेख या तिघांना अटक करून त्यांची पोलिस कोठडी घेतली आहे. पोलिस कोठडीमध्ये या आरोपींकडे तपास केल्यानंतर या तिघांनी चोरलेल्या तांब्याच्या तारा सोलापुरातील भंगार व्यापारी मारूफ शेख यास विकल्याचे सांगितले. त्यावरून रेल्वे पोलिसांनी सोलापुरात येऊन फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या मदतीने मारूफ शेख यास मंगळवारी ताब्यात घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांनी
सहकार्य केले.

सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त डॉ. श्रेयंश चिंचोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त मनोज सिसोदीया, पोलिस निरीक्षक ब्रिजेशकुमार, अमित जैन, सोलापूरचे पोलिस निरीक्षक अमित राघव, लातूरचे पोलिस निरीक्षक अरविंदकुमार, सहायक फौजदार सतिश कांबळे, मदने, हवालदार अरुणकुमार, शिपाई काशिनाथ फुलारी, विशाल गोरोले, अनिल धोटे यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

Back to top button