

सोलापूर : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये संतापाची लाट असतानाच सोलापूर शहरांमध्ये २५ पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय होणार आहे, अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी (दि.२५) दिली. ते सोलापूर सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.
पालकमंत्री गोरे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन ही माहिती दिली. २३ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्याने धर्म विचारून भारतीय पर्यटकांना गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याबाबत संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली असून सोलापूर मध्ये लॉंग टर्म व्हिसा असलेले ११ इतर १४ असे २५ पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. हे पाकिस्तानी नागरिक सिंधी हिंदू असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत पोलीस आयुक्त राजकुमार यांच्याशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून योग्य याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. हे पाकिस्तान नागरिक भारतात येण्यामागचा हेतू, त्यांचा पाकिस्तानमध्ये हिंदू म्हणून अन्याय झाला आहे का? याबाबतची चौकशी केली जाणार असल्याचेही गोरे म्हणाले.