सोलापूर : भीमा साखर कारखान्यासाठी खा. महाडिकांचा अर्ज दाखल
सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे. त्यासाठी सोमवारी दुपारी बारा वाजता शेकडो समर्थकांसह येऊन खासदार धनंजय महाडिक यांनी पुळूज मतदारसंघातून, तर त्यांचे चिरंजीव विश्वजित महाडिक यांनी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदाची निवडणूक शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने एकमेकांना विरोध न करता बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी आपण सहकार्य करावे, असे माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार राजन पाटील यांच्यासमोर आपण आवाहन केल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
याप्रसंगी महाडिक यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या गाड्यांनी रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळत होती.जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारले. यावेळी संजय क्षीरसागर, बिभीषण वाघ, भैय्या महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विनोद महाडिक, पवन महाडिक, सुनील चव्हाण, सतीश जगताप, लक्ष्मण गुरव, अंकुश आवताडे, शिवाजी गुंड यांच्यासह महाडिक यांचे शेकडो समर्थक, शेतकरी उपस्थित होते.

