उजनीचे पाणी पोहोचले औज बंधार्‍यात | पुढारी

उजनीचे पाणी पोहोचले औज बंधार्‍यात

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी हे रविवारी (दि. 26) औज बंधार्‍यात पोहोचले. सोमवारी या पाण्याने चिंचपूर बंधारा भरून घेण्याचे काम सुरू होते. यामुळे शहरावरील पाणीटंचाईचे संकट टळले असून, दोन महिन्यांसाठी पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाने ओढ दिल्याने भीमा नदीने तळ गाठला होता. दुसरीकडे उजनी धरणानेही मायनसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह शहरावरही पाणीटंचाईचे संकट होते. अशावेळी उजनीतून शहरासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यन, गेल्या सोमवारी (दि. 20) उजनी धरणातून नदीमार्गे पाणी सोडण्यात आले होते.

सर्वसाधारणपणे उजनीचे पाणी औज बंधार्‍यात पोहोचण्यास 10 दिवस लागतात. पण यंदा सर्व बंधार्‍यांची दारे आधीच उघडून ठेवल्याने औजमध्ये सहा दिवसांतच पाणी पोहोचले. सुमारे 232 कि.मी. अंतर पार करीत उजनीचे पाणी रविवारी पहाटे पाच वाजता औज बंधार्‍यात पोहोचले. रविवारी हा बंधारा पूर्ण क्षमतेने अर्थात साडेचार मीटरपर्यंत भरला. त्यानंतर ओव्हरफ्लोे झालेले पाणी चिंचपूर बंधार्‍यात भरून घेण्याचे काम सोमवारी सुरू होते. यंदा ऐन उन्हाळ्यास सुरुवातीलाच औज बंधार्‍यातील पाणी संपले होते.

प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे बंधारा कोरडा पडला. त्यामुळे शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. प्रशासनाच्या चुकीमुळे उजनीतून पाणी सोडण्याची कार्यवाही विलंबाने झाली. यामुळे लोकांना महिनाभर त्रास सोसावा लागला. या पार्श्‍वभूमीवर गत रोटेशनवेळी योग्य ती खबरदारी प्रशासनाने घेत समन्वय ठेवल्याने उजनीचे पाणी औज बंधार्‍यातय वेळेवर पोहोचले. गेल्या सोमवारी सोडलेले पाणी अपेक्षेपेक्षा लवकर सोडल्याने शहराला पाणीटंचाई भासली नाही. औज बंधारा भरल्याने दोन महिन्यांकरिता पाण्याची चिंता मिटली आहे. औज बंधारा परिसर तसेच उजनी पाणलोट क्षेत्रात यंदा भरपूर पाऊस झाल्यास शहराला पाण्याचा तुटवडा भासणार नाही.

Back to top button