

करमाळा : पुढारी वृत्तसेवा
दहिगाव योजनेतील चारी मधील २४ पाईप जळून तब्बल १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात करमाळा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद नचिकेत दिलीप राजमाने (वय २९ वर्षे), दि इंडीया हूम पाईप कंपनी रा. सध्या अविष्कार सोसायटी, प्लॅट नं १०६, शिक्षक कॉलनी जेऊर, मौजे जेऊर ता. करमाळा जि. सोलापूर मुळ रा. सातारा रोड, पाडळी ता. कोरेगाव जि. सातारा यांनी करमाळा पोलिसात दिली आहे. हा प्रकार १५ फेब्रुवारी सायंकाळी ६ ते १६ फेब्रुवारी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, दि इंडीया हूम पाइप कंपनी मार्फत दहिगाव उपसा सिंचन योजनेचे मौजे कुंभेज या ठिकाणी कॅनॉलमध्ये पाईप टाकण्याचे काम चालु आहे. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे काम चालते. दि. १५ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वाजेपर्यंत काम संपल्यानंतर सर्व कामगार घरी गेले. त्यानंतर फिर्यादीला दि.१६ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की, मौजे कुंभेज या ठिकाणचे कॅनॉलमध्ये टाकण्यासाठी ठेवण्यात आलेले २४ पाईप्स कोणीतरी अज्ञात इसमाने जाळुन नूकसान केले आहे.
घटनेबाबतची माहिती कंपनीचे वरीष्ठ अधिकारी जी.एल. म. मुजावर यांना कळवून सहकारी इरफान गाडद व सलीम शेख यांच्यासह घटनास्थळी भेट दिली असता कुंभेज येथिल संदीप भोसले यांची शेती गट नं ५६१ मधील कॅनॉलमध्ये बसवण्यासाठी ठेवण्यात आलेले २४ पाईप कोणीतरी अज्ञात इसमाने पुर्ण जाळून त्याचे नुकसान केल्याचे दिसून आले. त्यामुळे १५ लाख १ हजार ४१४ रुपये किमतीचे ६३० मिलिमीटर व्यासाचे ४ किलो दाबाचे १२ मीटर लांबीचे तब्बल २४ पीव्हीसी जलवाहिन्या जाळून नुकसान केल्याचा अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा करमाळा पोलिसांनी दाखल केला असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पोपटराव बबन टिळेकर हे करीत आहेत.