

सोलापूर : आषाढी वारीत वारकर्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी राज्य शासनाकडुन आतापर्यंत 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा नियोजन समितीतून 8 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिली.
राज्य शासनाने दिलेल्या 15 कोटीच्या निधीतून गरज असेल त्या ठिकाणी रस्ता दुरुस्ती, मुरुमीकरण, शौचालये आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतूनही वारकर्यांच्या आरोग्याची सुविधेसाठी निधी खर्च करण्यात येत आहे. मानाच्या पालख्यासमवेत 6 हजार 250 मोबाईल टायलेट असणार आहेत. याशिवाय आषाढी एकादशीच्या दिवशी एकाचवेळी पंढरपूरात गर्दी असणार असल्याने पंढरपूरात कायमस्वरुपी 4 हजार 500 मोबाईल टायलेटची सुविधा यंदा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पावसाच्या पाण्यामुळे टॉयलेट परिसरात चिखल होऊ नये यासाठी मुरुमीकरणही करण्यात येत आहे. वारकर्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राथमिक उपचाराचे किट देण्यात येत आहेत. याशिवाय अडीच हजार आरोग्य कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी डॉक्टरांचे सहकार्य यासाठी घेण्यात येत आहे. 143 बाईक अॅम्बुलन्स सुविधा तैनात करण्यात आली आहे. तर 28 रुग्णवाहिका पंढरपूरात असणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. पंढरपूरात गर्दी असलेल्या 13 ठिकाणी चेंगराचेंगरीची शक्यता गृहित धरुन याठिकाणी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे याशिवाय वारकर्यांना सुरक्षित गैस व वीज पुरवठा करण्यासाठीही स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहेत सुरक्षित गॅस व वीज पुरवठा असलेल्या ठिकाणी ग्रीन स्टीकर चिटकविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
वारीच्या काळात चंद्रभागा नदीत उजनीतील पाणी येणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात येत आहे. उजनी धरणात वारीच्या पार्श्वभूमीवर आदल्या दिवसापर्यंत 65 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पाऊस जास्त होऊन धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली तरी आठ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येईल. मात्र, यामुळे नदीत पूर्ण पाणी येणार नाही. असे नियोजन सुरू असल्याचेही आशीर्वाद यांनी सांगितले.
वारीकाळात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. कितीही व्हीआयपी असले तरी त्यांना मंदिर परिसरात चालतच यावे लागणार आहे. विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातही व्हीआयपीसोबत चारपेक्षा अधिक व्यक्ती मंदिरात सोडण्यात येणार नसल्याची माहितीही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.