

सोलापूर : दिवसेंदिवस शेतकरी ऊसपीकाकडे वळत असल्याने ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. मात्र ऊसतोड मजुरांची संख्या घटत आहे. ऊसतोडणी यंत्राशिवाय ऊसाची तोडणी अशक्य होत आहे. ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी किंमतीच्या 40 टक्के अथवा कमाल 35 लाख अनुदान शासनाकडून देण्यात येते. राज्यातील 257 पात्र लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली आहे. त्यापैकी 116 लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. उर्वरित 141 लाभार्थ्यांचे अनुदान थकले आहेत.
राज्यात ऊस क्षेत्र मोठ्याप्रमाणात वाढल्याने ऊस तोडणीसाठी मुनष्यबळ कमी पडत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. शिवाय सोलापुरात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. ऊसतोडणीसाठी मात्र मराठवाड्यातून मोठ्याप्रमाणात ऊसतोड मजूर आणले जाते. परंतु, मराठवाड्यातील अनेक ऊस तोड मजुरांनी आपला पारंपरिक व्यवसाय बदलले आहेत. ऊसतोड मजुरांची प्रचंड कमतरता भसत आहे. यामुळे नाईलाजास्तव यंत्रादद्वारे ऊसतोडणी करावी लागत आहे. राज्यात दरवर्षी ऊसाच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांची देखील कमतरता भासत आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 आणि 2023-24 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर अनुदानाची मुतद वाढविण्यात आली. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान शासनाकडून ऊसतोडणी यंत्र खरेदी करणार्यांना देण्यात येते. ऊसाची तोडणी वेळेवर होण्यासाठी ऊस तोडणी यंत्राव्दारे आवश्यक बनले आहे.
ऊस तोडणी यंत्राच्या किंमती जास्त असल्यामुळे यंत्राच्या खरेदीदारास काही प्रमाणात अनुदान उपलब्ध करून दिल्यास संकटात सापडलेल्या ऊस तोडणी यंत्रधारकांना आर्थिक समस्यातून सुटका मिळणार आहे. अनुदान रखडल्याने ऊस तोडणी यंत्रधारकांना फटका बसत आहे. वैयक्तिक शेतकरी, उद्योजक यांच्याबाबत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान दिले जाते. खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त तीन यंत्रांसाठी अनुदान देण्यात येते.
पात्र लाभार्थ्यांनी यंत्राच्या किंमतीच्या किमान 20 टक्के रक्कम स्वभांडवल भरून ऊस तोडणी यंत्र खरेदी केली आहे. उर्वरित रक्कम ही बँकेकडून कर्ज मंजुरी करून घेतले आहेत. मात्र, अनुदान मिळत नसल्याने दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढत आहे. अनुदान मिळाल्यास त्याचा फायदा ऊस तोडणी यंत्रधारकांना होणार आहे.