

कुर्डूवाडी : येथील एका घरात साठवून ठेवलेला 13 लाख 90 हजार 320 रुपयांचा गांजा गुन्हे अन्वेषण विभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला. या प्रकरणी अजिनाथ ऊर्फ महाराज नागनाथ वाघमोडे (वय 45, रा. पटेल चौक, कुर्डूवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांनी स्वतः कुर्डूवाडीत येऊन जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे संजय जगताप व पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्यासोबत पटेल चौकातील माढेश्वरी बँकेच्यावरील इमारतीत छापा टाकला. तेथे एका खोलीत पोलिसांना प्लास्टिकच्या काही गोण्यांमध्ये गांजा आढळून आला. एकूण 14 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद कुर्डूवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक विजय घोगरे यांनी दाखल केली आहे.