

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे नियोजित केले आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर प्रत्येकी १२ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले ९ बॅरेजेस बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सोलापूर जिल्हा जलसंपदा आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी वाहून पुढे जाते. नंतर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पाणी नियोजन ठेवण्यासाठी मोठे बॅरेजेस निर्माण करण्याचे प्रस्तावित केले आहे. पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर ९ बॅरेजेस निर्माण केले जाणार आहेत. प्रत्येक बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता ही जवळपास १२ टीएमसी इतकी असणार आहे. त्यामुळे याचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना मिळणार होणार आहे. शेतजमीन सिंचनाखाली आल्याने या भागातील शेतकर्यांच्या उत्पादनात देखील वाढ होणार आहे.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग तसेच धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर पाटील म्हणाले, जलसंपदा विभागामार्फत आउटसोर्सिंगद्वारे पुढील एक-दोन महिन्यात १४ हजार अधिकारी आणि कर्मचार्यांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सिंचन प्रकल्पासाठी शेतकर्यांच्या घेण्यात आलेल्या जमिनीचा त्यांना योग्य मोबदला वेळेत मिळावा यासाठी जलसंपदा विभाग व महसूल विभागाच्या भूसंपादन शाखेनी एकत्रित येऊन शिबिराचे आयोजन करावे व संबंधित शेतकर्यांच्या तक्रारींचा निपटारा करून त्यांना तात्काळ मोबदला देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी पाटील यांनी दिले. अशाप्रकारची शिबिरे लवकर आयोजन करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्कही साधला.
यावेळी त्यांनी जिल्ह्यात जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेली विविध सिंचन प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करा. प्रस्तावित करण्यात आलेली कामे मंजूर करून घेऊन तेही विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचार्यांनी प्रयत्न करावेत. यावेळी जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शक सूचनाही त्यांनी .िदिल्या. दिल्या. ( ९ बॅरेजेस बंधारे)
मुख्य अभियंता धुमाळ व अधीक्षक अभियंता बागडे यांनी ही जलसंपदा विभागामार्फत सोलापूर जिल्ह्यातील विविध उपसा सिंचन योजनांची माहिती बैठकीत सादर केली. प्रारंभी लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पाचे अपुरे कामे, बॅरेजेस अभावी वाहून जाणारे पाणी अडविणे, शेतकर्याकडून संपूर्ण हंगामाची पाणीपट्टी ऐवजी वापरेल तेवढे पाण्यावर पाणीपट्टी वसूल करणे, जलसंपदा विभागातील अपुरे मनुष्यबळ व सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत वाढ करण्याच्या अनुषंगाने विविध योजना, त्या सोडवण्याबाबत मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
जलसंपदा विभागाचे सचिव राजपूत म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांकडून प्रतिवर्षी किमान तीस कोटी रुपयांची सिंचन पाणीपट्टी मिळणे अपेक्षित आहे. पण प्रतिवर्षी केवळ १० कोटी रुपये शेतकर्याकडून भरले जातात. त्यामुळे प्रतिवर्षी वीस कोटींची थकबाकी राहते. त्यामुळे थकबाकी वाढल्याने अनेक आडचणी येत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांनी सिंचन पाणीपट्टी वेळेवर भरावी.
यावेळी आमदार समाधान अवताडे, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दीपक साळुंखे, अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचलंत का?