जगभरातील विठ्ठलभक्त आता थेट विमानाने पंढरीला येऊ शकतील

Solapur Airport | सोलापूर सरळ हवाई मार्गाने जोडले गेले
Solapur Airport
जगभरातील विठ्ठलभक्त आता थेट विमानाने पंढरीला येऊ शकतीलPudhari Photo
Published on
Updated on

पुणे/सोलापूर : भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना एक भेट मिळाली आहे. सोलापूर सरळ हवाई मार्गाने जोडले गेले. सोलापूर विमानतळाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, इथल्या टर्मिनल बिल्डिंगची क्षमता वाढवली आहे. प्रवाशांसाठी नव्या सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत. त्यामुळे देश- विदेशातील विठ्ठलभक्त आता थेट विमानाने इथे येऊ शकतील. त्यामुळे पंढरपूरसह संपूर्ण विभागातील उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे उद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुण्यात काढले.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दिल्लीतून आभासी पद्धतीने (ऑनलाईन) महाराष्ट्रातील सुमारे ११ हजार २०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन कळ दाबून झाले. हा कार्यक्रम पुण्यातील सारसबागेसमोरील गणेश कला क्रीडा केंद्राच्या भव्य सभागृहात रविवारी, २९ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, महायुती सरकारमधील मंत्री उपस्थित होते. राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आभासी पद्धतीने उपस्थित होते.

माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनो...

पुण्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि भावांना माझा नमस्कार... या मराठी वाक्याने मोदी यांनी पुणेकरांना साद घालत भाषणाला सुरुवात करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतर हिंदीतून सुमारे अर्धा तास त्यांनी संवाद साधला.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान

पंतप्रधान मोदी म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली शाळा आणि भिडे वाडा यांचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले, हे माझे भाग्य समजतो. सावित्रीबाईंनी मुलींसाठी देशात पहिली शाळा सुरू केली. हा ठेवा जपून ठेण्याची गरज आहे. देशातील या मुलींच्या पहिल्या शाळेची पुनर्बाधणी होत आहे. यात कौशल्य विकास केंद्र, वाचनालय तयार होत आहे. पुणे शहर 'इज ऑफ लिव्हिंग' बनविण्याचे आमचे स्वप्न साकार होत आहे.

त्यांना एक खांबही उभा करता आला नाही; मोदींची विरोधकांवर टीका

जुन्या सरकारला एक खांबही उभा करता आला नाही. पुण्यातील मेट्रोचा विषय प्रथम २००८ मध्ये समोर आला. पण, त्याला मूर्त रूप दिले ते २०१४ मध्ये आलेल्या आमच्या सरकारने. अनेक अडचणी बाजूला सारल्याने पुणे मेट्रो मोठ्या गतीने धावण्यास सुरुवात झाली आहे. जुन्या पद्धतीने चाललो असतो तर २०१६ ते २०२४ या काळात पुण्यात जो मेट्रोचा विस्तार आज दिसतोय, तो इतक्या गतीने झालाच नसता. मागच्या सरकारला आठ वर्षांत मेट्रोचा एक खांबही उभा करता आला नाही, अशी जोरदार टीका मोदी यांनी विरोधकांवर केली.

जेव्हा जेव्हा विकासकामांत अडथळे तेव्हा महाराष्ट्राचे नुकसान

जेव्हा जेव्हा विकासकामांत अडथळे आले तेव्हा महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारच्या आधीच्या सरकारने अनेक प्रकल्पांत खोडा घातला. माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांनी ऑरिक सिटीची कल्पना मांडली. त्यांनी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोरच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरात शेंद्रा बिडकीन इंडस्ट्रियल कॉरिडोरचा पाया रचला. पण मध्यंतरी विरोधी सरकार आले आणि हे काम ठप्प पाडले. आता पुन्हा शिंदे यांच्या सरकारने त्या कामांना गती दिली.

सोलापूर विमानतळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

सोलापूर विमानतळावर ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले, माजी खासदार डॉ. जयासिद्धेश्वर स्वामी, वरिष्ठ अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, सोलापूर विकास मंचचे केतन शहा, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्यासह व्यवसायिक, उद्योजक विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

खासदारांचीही अनुपस्थिती

होटगी रोडवरील सोलापूर विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. त्याचे थेट प्रक्षेपण होटगी विमानतळ येथील सभागृहात दाखवण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, माजी खासदार शरद बनसोडे यांच्यासह विविध आजी, माजी आमदार, खासदारांची अनुपस्थिती होती. अकलूजमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला ते गेल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news