

सातारा : पुढारी वृत्तसेवा बाईक रायडरमधील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत सातारच्या हिरकणी बाईक राईड करत साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेणार आहेत. हिरकणी बाईक रायडर्सच्या टीम लिडर मनिषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रुपच्या सदस्या दि. 10 ऑक्टोबर रोजी 1 हजार 868 किमी प्रवासासाठी निघणार असून याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे.
नवरात्रोत्सव हा अदिशक्तीच्या जागराचा उत्सव आहे. या आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन बाईक रायडींग करत जावून घेण्याचा विडा सातार्यातील हिरकणी बाईक रायडर्स ग्रुपच्या सदस्यांनी उचलला आहे.
महिलांनी सर्वच क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. त्यामुळे बाईक रायडींगमध्ये तरी मागे का रहायचे या विचाराने प्रेरित होवून हिरकणी बाईक रायडर ग्रुपच्यावतीने साडेतीन शक्तीपीठ दर्शन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेत मनिषा फरांदे यांच्यासह अंजली शिंदे, मोना निकम-जगताप, शुभांगी पवार, अर्चना कुकडे, ज्योती दुबे, केतकी चव्हाण, भाग्यश्री केळकर, श्रावणी बॅनर्जी, उर्मिला भोजने या सदस्या सहभागी होणार आहेत.
सातारा येथून दि.10 ऑक्टोबर रोजी प्रवासास प्रारंभ होणार असून सुरुवातीला कोल्हापूर येथील अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन तुळजापूर, नांदेड, माहूर, वाशी, औरंगाबाद, नाशिक, वणी व पुन्हा सातारा असा सुमारे 1 हजार 868 किमीचा प्रवास बाईकवरुन करणार आहेत.
बाईकवरुन शक्तीपीठांच दर्शन घेणारा हा महिलांचा पहिलाच ग्रुप असल्याने त्यांच्या या प्रवासाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याची माहिती टीम लीडर मनिषा फरांदे यांनी दिली आहे.
बाईक रायडर्स करणार जनजागृती…
जिल्ह्यासह राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे. अशा परिस्थितीत हिरकणी बाईक रायडर्सची साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन मोहीम ही महिला सबलीकरणाला बळ देणारी ठरणार आहे. या दरम्यान राज्यातील 10 जिल्हे व 24 तालुक्यांमध्ये प्रवास होणार आहे. या प्रवासामध्ये महिला सक्षमीकरण, स्तनाचा कॅन्सर, रस्ता सुरक्षेबाबत हिरकणी बाईक रायडर्स जनजागृती करणार
आहेत.