साताऱ्यात अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी फोफावली; शिकण्या-सवरण्याच्या वयातच हातात शस्त्रे

साताऱ्यात अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी फोफावली; शिकण्या-सवरण्याच्या वयातच हातात शस्त्रे
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीचे भीषण वास्तव वारंवार समोर येत असल्याने हा प्रश्न चिंतेचा बनू लागला आहे. वाई येथील अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलांनीच हातपाय तोडून केलेल्या निर्घृण खुनामुळे या प्रश्नाला पुन्हा नव्याने वाचा फुटली आहे. अनेक भीषण घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले असून याप्रश्नी सामाजिक चळवळ उभी राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

सातारा शहराला पेन्शनरची सिटी म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर सामाजिक शांतता व सलोखा राखणारा जिल्हा म्हणूनही साताऱ्याकडे पाहिले जाते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत साताऱ्यातील गुन्हेगारी फोफावू लागल्याचे विदारक चित्र आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी मानसिकता जिल्ह्याची डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नव्या पिढीतील तरुणांचे कसे होणार?, शिकण्यासवरण्याच्या वयात हातात पेन, पुस्तके घेण्याऐवजी रिव्हॉल्व्हर, चाकू, सुरे घेणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या भविष्याचे काय होणार? अशी चिंता सातारकरांना लागून राहिली आहे.

मोबाईल, सोशल मीडियाच्या माध्यमातून वाम मार्गाला लागणाऱ्या शाळकरी मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हातात बंदुका, कोयते घेवून एकमेकांना संपवण्याचे सत्रच सुरु झाले आहे. एवढेच नव्हे तर कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी टोळी बहाद्दर गुन्हेगार अल्पवयीन मुलांना हाताशी धरत आहेत. सातारा शहरात दीड महिन्यांपूर्वी आप्पा मांढरे यांच्यावर वर्दळीच्या राजवाडा परिसरात फायरिंग झाले होते. हल्लेखोरांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश होता.

नटराज मंदिर येथेही पाच महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलांचा खुबीने वापर करून फायर करत अर्जुन राणा याचा मर्डर झाला होता. साताऱ्यातील बकासुर गँगमध्येही बहुतांशी अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांनी भरदिवसा बुधवार नाका येथे एकावर प्राणघातक हल्ला केला आहे. दरम्यान, घरफोडी करण्यासाठी अनेकदा खिडक्यांमधून जाण्यासाठी तसेच पत्रे कापून त्यातून अल्पवयीन मुलांना पाठवून ऐवज, मुद्देमाल चोरीच्या घडना घडल्याचे पोलिस तपासात कायम समोर आले आहे.

सुरुवातीला लहान मुलांना मौजमस्तीची सवय लावायची, खायला, फिरायला न्यायचे, वाढदिवस साजरा करण्याचे फेंड, छान कपडे, गिफ्ट देवून भुलवायचे अशी जीवनशैली अल्पवयीन मुलांच्या अंगवळणी पाडली जात आहे. त्यातूनच पुढे अशा मुलांकडून खून करून घेणे, घरफोडीसाठी त्यांचा वापर करणे असे प्रकार सर्रास सुरु असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. हे सर्व गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रथम कुटुंबियांनी पुढाकार घेतला पाहिजे. कायद्याचे रक्षक असणाऱ्या सातारा जिल्हयातील पोलिस दलानेही काही संकल्पना राबवल्या पाहिजेत, सामाजिक भान म्हणून याप्रश्नी चळचळ उभी राहिली पाहिजे. तरच कुठेतरी हे भीषण वास्तव बदलणार आहे. त्यासाठी सामाजिक संस्था, संघटना यांनी पुढे येण्याची गरज आहे.

मुळशी पॅटर्न… अन् लोकांमधून उठावही गरजेचा…

मुळशी पॅटर्नमध्ये एका पोलिसाचा मुलगा चुकीच्या संगतीला लागलेला असतो. तो मुलगा स्वतः पाकिटामध्ये पिट्याभाईचा फोटो ठेवून त्याला आदर्श मानत असतो. यामुळे पोलिस पिता चिंतेत असतो. पोलिस अधिकाऱ्याच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तो पोलिसाच्या मुलाला अगोदर बोलवतो. त्यानंतर पिट्या भाईला बोलावून त्याला खाली जमिनीवर बसवले जाते. पोलिस त्याला एन्काऊंटरची ऑर्डर झाल्याचे सांगून बदडायला सुरुवात करतात. यावर पिट्याभाई रडतो, पोलिसांचे पाय धरतो. चुकले सांगून पुन्हा वाम मार्गाला लागणार नाही, अशी कबुली देतो. पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या या कृतीमुळे पोलिस बॉयचे डोळे खाडकन् उघडतात व तो पाकीटमधील पिट्याभाईचा फोटो काढून फाडून टाकतो. अशाच आयडिया वापरून जे युवक भरकटत आहेत त्यांना चांगल्या प्रवाहात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी केवळ पोलिस यंत्रणेवर जबाबदारी न ढकलता सामाजिक बांधिलकी म्हणून लोकांमधूनही उठाव होण्याची गरज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news