

सातारा : जून महिना संपत आला तरी अद्यापही पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपाच्या पेरण्या कधी होणार? याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बुधवारी सातारा शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. सातारा जिल्ह्यात सर्व तालुक्यात पावसाची चातकासारखी वाट शेतकरी पहात आहेत.
दरवर्षी 7 जूनला मृग नक्षत्र सुरू होवून पावसाळा सुरू होतो. मात्र, पंधरा दिवस झाले तरी अद्यापही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतींची कामे खोळंबली आहेत. सातारा शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी आभाळात ढग दाटून येवून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अल्पकाळ पडलेल्या या पावसाच्या सरींमुळे अनेकांची तारांबळ उडाली. मार्केटमध्ये सायंकाळच्यावेळी खरेदीसाठी आलेल्या लोकांची धावपळ झाली.