

सातारा ; पुढारी वृत्तसेवा
सातार्यातील फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेल्या ट्रकचे हाप्ते थकल्यानंतर त्याची परस्पर विक्री करून मुळ मालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
ट्रकचे हाप्ते थकल्यानंतर ते खरेदी करण्याच्या बहाण्याने नोटरी करून ट्रक घेवून मूळ ट्रक मालकांची फसवणूक केली होती. अशी फसवणूक करणार्या टोळीचा सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) पर्दाफाश केला.
गोवा, गुजरातसह महाराष्ट्र राज्यातील 12 जिल्ह्यात या गुन्ह्याची व्याप्ती असून पोलिसांनी 2 कोटी 65 लाख रुपये किंमतीचे ट्रक, बोलेरोसह टमटम अशी 24 वाहने पोलिसांनी जप्त केली.
उन्मेश उल्हास शिर्के (वय 48, रा.निरा ता.पुरंदर, पुणे), अब्दुलकादीर मोहम्मद अली सय्यद (रा.सुपा ता.पारनेर, अहमदनगर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान, याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
संशयितांनी तब्बल 45 जणांना अशा पध्दतीने गंडा घातल्याची कबुली दिली. गुन्ह्याची व्याप्ती पाहून डीबीच्या पथकाने तपासाचा फास आवळला व एक-एक करत वाहने जप्त करण्यास सुरुवात केली.
पोलिसांच्या तपासामध्ये संशयितांनी सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, बुलढाणा, पनवेल, ठाणे, रायगड, सांगली, गोवा, गुजरात अशा विविध भागातील लोकांची याच पद्धतीने फसवणुक केल्याचे समोर आले. अशा प्रकारे पोलिसांनी 14 ट्रक, 7 टाटा मॅजिक (छोटा हत्ती), सुमो 1 अशी सुमारे 3 कोटी रुपयांची वाहने 4 वाहने जप्त केली आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील राज्यातील अशा प्रकारे ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.