सातारा : पंक्चर काढत असताना पिकअपला ट्रकने ठोकरले; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सातारा : पंक्चर काढत असताना पिकअपला ट्रकने ठोकरले; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पाचगणी : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड येथील उड्डाण पुलावर पंक्चर काढत असलेल्या पिकअप टेम्पोला ट्रकने धडक दिली. या गंभीर अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. ही दुर्घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली.
प्रभास बाळासो शिंदे (वय २३, रा. भाळवणी, ता. खानापूर), ज्ञानेश्वर तुकाराम बोरडे (२४, रा. गिलस्ती, ता. राजगुरूनगर, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

पुणे बाजूकडून दोन पिकअप जीप साताऱ्याकडे निघाल्या होत्या. त्यातील एक पिकअप पाचवड येथील पुलावर पंक्चर झाली. त्यामुळे पाठीमागील दुसरीही पिकअप तेथेच थांबवून पंक्चर झालेल्या गाडीचे चाक काढले जात होते. यावेळी भरधाव वेगातील ट्रकने धडक दिली. त्यामध्ये चाक काढण्याच्या कामात व्यस्त असलेल्या प्रभास शिंदे याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झाल्याने ज्ञानेश्वर तुकाराम बोरडे व स्वप्नील धनावडे (रा. भाळवणी) या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ज्ञानेश्वर बोरडे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी पोलीस जवान गंगावणे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पाठवले. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news