सातारा; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या अमृत-02 योजनेमधून सातार्यातील गोडोली तलावाच्या सुशोभिकरणासाठी दाखल केलेल्या सुमारे 4 कोटी 50 लाखांच्या प्रस्तावास केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. गजेंद्रसिंग शेखावत यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. या मोठया निधीमधून तलावातील गाळ काढणे, तळ्याच्या बाजुने पाथ-वे तयार करणे, मजबूत कंम्पाऊंड वॉल बांधणे, तळयामध्ये कारंजे उभारणे, एस.टी.पी., बगिचा, लॉन तसेच जीम आणि वाचनालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
गोडोली तळ्याला पूर्वी नुसते पाण्याच्या मोठ्या डबक्यासारखे स्वरुप होते. परंतु सातारकर आणि विशेष करुन गोडोलीकरांनी या ठिकाणी शासनाच्या विविध यंत्रणामार्फत आणि प्रसंगी लोकसहभागातून मोठा तलाव निर्माण केला आहे. आज रोजी या तलावात नेहमी पाण्याचा मोठा साठा असतो. येथील तलावाचे अत्याधुनिक पध्दतीने नुतनीकरण करणे, नवीन सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याकामी आम्ही ना.गजेंद्रसिंग शेखावत यांच्याशी संपर्क साधून अमृत-02 मधून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत आग्रह व्यक्त केल्यावर या प्रस्तावास ना. शेखावत यांनी तातडीने तत्वतः मंजुरी दिल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
याबाबतचा निधी लवकरच सातारा नगरपरिषदेकडे वर्ग होणार आहे. निधी वर्ग होताच पुढील कार्यवाही करण्यात येवून सातारकरांना तलावाला भेट देवून येथील सुविधांचा एक वेगळा आनंद उपभोगता येणार आहे. सातारकरांच्या विविध सुविधांसाठी जास्तीत जास्त केंद्र शासनाचा निधी आणणे हे आमचे धोरण राहिले आहे. त्यानुसार पुन्हा केंद्राकडून साडेचार कोटींचा निधी उपलब्ध होत असल्याने त्याचे वेगळे समाधान आहे, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.