

ढेबेवाडी; पुढारी वृत्तसेवा : विहिरी जवळ ग्रामपंचायतीने सोडलेल्या गटरच्या पाण्यामुळे विहिरीचे पाणी दूषित होत असल्याच्या तक्रारी वरून विंग ता. कराड ग्रामपंचायतीने बांधलेले गटारच चोरीस गेल्याचा आरोप तेथील रहिवासी प्रसाद अशोक माने यांनी केला आहे. तिथे गटर बांधले होते का? की शासनाला खोटा अहवाल दिला याबाबत विंगचे ग्रामसेवक रोंगटे, चौकशी करणारे विस्तार अधिकारी सोनावणे व तात्कालीन गटविकास अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करा, अशी मागणी प्रसाद माने यांनी केली आहे.
विंग येथील प्रसाद अशोक माने यांनी दिलेल्या निवेदना नुसार विंगग्रामपंचायतीने मार्च 2020 मध्ये कुंभार वस्तीतून बांधलेले गटर पुढे वळवून जुन्या गटरला जोडायचे होते. मात्र तसे न करता पंचायतीने ते पुढे नेऊन आमच्या विहिरी जवळ नेऊन सोडले त्या गटरच्या घाण पाण्यामुळे विहिरीचे पाणी दूषित होत आहे. अशी तक्रार मार्च व एप्रिल 2020 मध्ये ग्रामपंचायतीकडे वारंवार केली होती; पण ग्रामपंचायतीने दाद दिली नाही. म्हणून 23 एप्रिल 2020 रोजी आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली होती. तक्रारीस अनुसरून शासनाकडून संबंधित तक्रारीवर गटविकास अधिकारी कराड यांच्याकडे या तक्रारीचे निवारण करून अहवाल मागविण्यात आला होता. त्यानुसार कराडच्या गटविकास अधिकार्यांनी नेमलेल्या चौकशी अधिकारी सोनावणे यांनी माझ्याशी संपर्क साधून सध्या लॉकडाऊन सुरू आहे, लॉकडाऊन उठल्यावर या ठिकाणी पक्के गटर बांधकाम मी स्वतः ग्रामपंचायतीकडून करून घेतो असे सांगितले व आता तुम्ही गटर बांधकाम केल्याचे लेखी द्या, अशी विनंती केली. तेंव्हा अधिकारी आहे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेऊन मी तसे लेखी दिले होते व त्यांनी खोटा अहवाल 18 मे 2020 रोजी शासनाला पाठविला पण ते काम मात्र आज अखेर झालेच नाही.
तीन वर्षे होवूनही गटाराचे काम झाले नाही. याबाबत ग्रामसेवक रोंगटे, विस्तारअधिकारी सोनावणे यांच्या अहवालावरून गटविकास अधिकारी कराड यांनी दिलेले अहवाल खोटे आहेत व त्यांनी आमची आणि शासनाचीही फसवणूक केली आहे. ग्रामसेवक म्हणतात आता ते गटर बांधणे शक्य नाही आणि गटारीच्या पाण्यामुळे माझ्या विहिरीचे पाणी आजही दूषित होत आहे. या पाण्याचा वापराने कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने लक्ष याकडे लक्ष द्यावे.