सातारा कृषी विभागीय कार्यालयातून हालचाल रजिस्टर गायब
सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा कृषी विभागीय कार्यलयातून हालचाल रजिस्टरच गायब झाले आहे. हे रजिस्टरच सापडत नसल्यामुळे कार्यालयातील अनागोंदी समोर आली आहे. सातारा विभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांचे कार्यालयात दुर्लक्ष होत असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. अधिकारीच जागेवर नसल्याने शेतकर्यांची प्रचंड गैरसोय होत असून या बेशिस्तीबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
कार्यालयीन कर्मचार्यांसाठी हालचाल रजिस्टर ठेवणे बंधनकारक आहे. बर्याचदा कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचार्यांना कार्यालयाबाहेरही जावे लागते. काही कर्मचारी याचा गैरफायदा घेवून इतरत्रही वेळ घालवण्याची शक्यता आहे. सरकारी वेळत खाजगी कामे करणारेही काहीजण या कार्यालयात आहेत. मिटिंग, बैठका, व्हीसी, कुशल कार्यक्रम, कार्यशाळा अशी कारणे सांगूनही कार्यालयातून पसार होणार्यांची संख्या कमी नाही. या कार्यालयातील एकजण कार्यालयात हजेरी लावल्यानंतर दिवसभर गायबच असतो. वैयक्तिक व्यवसायालाच प्राधान्य देवून कार्यालयातील सरकारी सेवा याच्यासाठी जणू पार्ट टाईमच आहे, असे पहायला मिळत आहे. इतके धाडस कसे वाढते? मोकाट उंडारणार्यांना कोणत्या गुरुचे पाठबळ मिळते? असा सवाल शेतकरी करु लागले आहेत.
मोकाट सुटलेल्या या कर्मचार्यांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी हालचाल रजिस्टर ठेवणे आवश्यक असते. मात्र तशा रजिस्टरचे विभागीय कार्यालयाला वावडे असल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यालयातील कर्मचार्यांच्या नोंदीसाठी आवश्यक असणारे रजिस्टरच सापडत नसल्याचे संबंधित कर्मचार्याने सांगितल्याने एसडीओ कार्यालयाच्या कारभारावर शंका उपस्थित झाल्या आहेत. कार्यालयात कोण किती वाजता येतो, किती वाजता बाहेर जातो, बाहेर जातानाचे कारण त्या रजिस्टरमध्ये नमूद करणे आवश्यक असते. मात्र तशा कसल्याही नोंदी सातारा विभागीय कृषी विभागाकडून ठेवल्या जात नसल्याचेही यावरुन स्पष्ट झाले आहे. आओ जाओ घर तुम्हारा, असे चित्र या कार्यालयात आहे. कार्यालयाला अजिबात शिस्त नसल्यामुळे शेतकर्यांवर मनस्तापाची वेळ आली आहे. शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या असून बेशिस्त वर्तन करणार्या अधिकार्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे.
विभागीय अधिकार्यांची दैनंदिनी तपासा
सातारा विभागीय कृषी कार्यालयात प्रचंड बजबजपुरी माजली आहे. कुणाचा कुणाला पायपोस नाही. वरिष्ठच जागेवर नसतात म्हटल्यावर कर्मचार्यांनी कुणाचा आदर्श ठेवायचा? असा प्रश्न आहे. विभागीय कृषी अधिकार्यांच्या वाहनाचे लॉगबुक तसेच त्यांची दैनंदिनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकार्यांनी तपासावी. दैनंदिनीनुसार सातारा विभागीय कृषी अधिकार्यांचे कामकाज झाले आहे की नाही, याची खातरजमा करुन पुढील कारवाई करावी, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.

