सातारा: ‘आरोग्य’ चे ११३ कंत्राटी कर्मचारी पगाराविना; तीन महिने वेतनच नाही

आरोग्य कर्मचारी
आरोग्य कर्मचारी

सातारा: पुढारी वृत्तसेवा : आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या राज्यातील ३५०० तर जिल्ह्यातील ११३ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहेत. कंत्राटदार एजन्सी असणाऱ्या यशस्वी अकॅडमी फॉर स्किल या संस्थेने पगार न केल्याने या कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ आली असून कर्मचाऱ्यांमध्ये कंत्राटदार विरोधात संतापाची भावना आहे. पगार रखडवण्याची ही यशस्वीची दुसरी वेळ आहे. कमी पगारात कर्मचाऱ्यांना राबवून त्यांना मोबदला न देणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी व पगार वेळेत व्हावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात जीवाची पर्वा न करता या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम केले. लसीकरण मोहिमेतही महत्वपूर्ण भूमिका बजावली. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी हाक देताच मदतीला धावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मात्र तीन महिन्यांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. यशस्वीने कर्मचाऱ्यांचे पगार न केल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अवघ्या ८ ते १० हजारांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न झाल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्यांचे घरभाडे थकलीत तर कर्ज घेतलेल्यांना बँकेतील कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. पगारासंदर्भात विचारणा केल्यानंतर एजन्सीमार्फत प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहे.
दरम्यान, यासंदर्भात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसमोर व्यथा मांडल्यानंतर तुमच्या पगाराचा आमच्याही काहीही संबंध नाही, एजन्सीला बोला असे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याने कर्मचारी संताप व्यक्त करत आहे. पगार मिळत नसल्याची वाच्यता केल्यास कामावरून काढून टाकण्यात येईल, असा दमही एजन्सीच्या प्रतिनिधींद्वारे देण्यात येत असल्याने नोकरी गमावण्याच्या भितीने अनेकजण गप्प आहेत.

हक्काच्या पगारावर यापूर्वीही डल्ला

जानेवारी, फेब्रुवारी २०२२ मध्ये कर्मचाऱ्यांची ऑनलाईन हजेरी लावण्याच्या सूचना यशस्वी एजन्सी मार्फत देण्यात आल्या होत्या. ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने त्यावेळी कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. परंतु, ऑनलाईन पध्दतीने हजेरी लावताना उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे कर्मचारी हजर असूनही गैरहजर दाखवण्यात आले. त्यावेळी ऑनलाईनमध्ये जितके दिवस भरले तितक्या दिवसाचेच पगार देण्यात आले. अनेक कर्मचाऱ्यांच्या हाती पगार कमी आल्याने त्यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यावेळी नंतर पगार करण्यात येईल, असे आश्वासन कर्मचाऱ्यांना देण्यात आले. आता ९ ते १० महिन्यांचा कालावधी लोटला तरी कर्मचाऱ्यांना त्यावेळचा हक्काचा पगार अद्याप मिळाला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news