संक्रांतीच्या सुगड्यांसाठी फिरू लागली गरागरा चाके

संक्रांतीच्या सुगड्यांसाठी फिरू लागली गरागरा चाके
Published on
Updated on

पुसेसावळी : विलास आपटे :  सुवासिनींचा वसा व अखंड सौभाग्याचे लेणे म्हणून ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात घरोघरी दिली जाणारी मातीची सुगडी (मडकी, लोटकी) बनवण्यात कुंभार आळीतील कारागीर व्यस्त झाले आहेत. एकीकडे पारंपरिक तर दुसरीकडे आधुनिक चाके फिरू लागली आहेत.

दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणादिवशी सुवासिनींचा वसा म्हणून प्रत्येक घरी पाच मातीची मडकी (सुगडी) पूजण्याची प्रथा आहे. लग्न होऊन नववधू घरी आल्यापासून प्रत्येक वर्षी हा वसा चालू होतो. सुवासिनी पहाटे उठून ही सुगडी एका पारावर देवाजवळ ठेवून त्यांना चुन्याच्या टिकल्या लावून प्रत्येक सुगडीत उसाच्या कांड्या, हरभरा, पावटा, भुईमुगाच्या शेंगा, गाजर ठेवून त्यांचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करून, या सुगडांना नवीन कोऱ्या कापडाने दिवसभर झाकून ठेवतात. संक्रांतीनंतर एक नवे पर्व सुरू होते, अशी आख्यायिका आहे.

ग्रामीण भागात सुवासिनी या दिवशी या सुगड्यांचे पूजन करतात. तसेच ही सुगडी देणारा कुंभार हा एक भाऊ आहे. तो भावाच्या नात्याने आपल्या बहिणीचे सौभाग्य अबाधित राहावे, अशी मनोकामना करतो. तसेच कुंभाराच्या रुपाने प्रत्येक गावातील प्रत्येक घरी जेवढ्या सुवासिनी आहेत त्यांना प्रत्येकी पाच याप्रमाणे ही मडकी देतो. या बदल्यात या कुंभारांना गृहिणी धान्य देतात.

रथसप्तमीला उपवासाच्या दिवशी दूध उतू घालवण्यासाठी मातीच्या लहान सुगड्यांनाही मागणी असते. आता मोठ्या सुगड्यांबरोबर लहान सुगडे घडवण्याचे काम जोमाने सुरू आहे. संक्रांतीच्या अगोदर साधारण एक महिना कुंभार आळीत ही सुगडी बनवण्यास सुरुवात होते… त्यासाठी लागणारी माती हल्ली विकत घ्यावी लागते. त्या मातीत घोड्याची लीद मिसळून ती माती एकजीव करुन सुगडी तयार केल्या जातात. सुगड्या भट्टीत भाजून घेतल्या जातात.

आजही सुगडीचे महत्व कायम

कोकणात घरोघरी वापरल्या जाणाऱ्या खापरी, परळ, रांजण, तवी, भानवली, चुली यासारख्या वस्तू इतरवेळी कुंभार परंपरेने बनवत असतातच. पण बदलत्या जीवनशैलीत संक्रांतीच्या आनंदाचे इतर संदर्भ बदलले तरी सुगडी हा संक्रांत सणाचा अविभाज्य घटक आजही कायमच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news