शिखर शिंगणापूर : सचिन बडवे माण तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यात अद्यापपर्यंत मोसमी पावसाने हजेरी लावली नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. माणमधील प्रमुख दहा तलावांमध्ये 23 टक्के केवळ पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर तालुक्यातील 5 गावांसह 26 वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पावसाने ओढ दिल्यास माण तालुक्यात टंचाईचे सावट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
निसर्गाची अवकृपा असलेल्या दुष्काळी माण तालुक्यातील जनतेला नेहमीच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. माण तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 450 मिलिमीटर असून गेल्या दोन-तीन वर्षांत तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन वर्षात तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने ओढे, नाले, तलाव, विहिरींसह मध्यम व लघु प्रकल्प तुडुंब भरले होते, तर भूगर्भातील पाणीसाठ्यातही वाढ झाली होती. समाधानकारक झालेला पाऊस तसेच गावोगावी झालेली जलसंधारणाची कामे यामुळे आतापर्यंत तालुक्यात टंचाईची तीव्रता जाणवलीनाही.
परंतु मोसमी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे माण तालुक्यात नजीकच्या काळात टंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील मध्यम व लघू प्रकल्प असलेल्या दहा प्रमुख तलावातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. या दहा तलावांची एकूण पाणीसाठवण क्षमता 29.87 दशलक्ष घनमीटर असून एकूण सध्या 6.95 दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये लोधवडे, गंगोती, महाबळेश्वरवाडी, मासाळवाडी हे चार तलाव कोरडे पडले आहेत तर उर्वरित सहा तलावांमध्ये सरासरी 23 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये जाशी 44 टक्के, राणंद 38 टक्के, पिंगळी 17 टक्के, जांभुळणी 15 टक्के, ढाकणी 11 टक्के, तर तालुक्यातील सर्वाधिक पाणीसाठवण क्षमता असलेल्या आंधळी धरण क्षेत्रात केवळ 14 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर तालुक्यातील लहानमोठ्या तलावातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे चित्र आहे.
सध्या माणदेशी बळीराजा मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत असून शेतकर्यांनी बाजरी, मूग, मटकी, मका यासारख्या खरीप पिकांची पेरणी केली आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. वेळेत पाऊस न झाल्यास तालुक्यामध्ये टंचाईच्या झळा जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.