महाराष्ट्र केसरीत ‘साताऱ्या’चा शहू घुमणार?; २३ वर्षांपासून चंदेरी गदेची प्रतीक्षा

कुस्ती
कुस्ती

सातारा : विशाल गुजर :  सातारा जिल्हा २३ वर्षांपासून महाराष्ट्र केसरीच्या मानाची चंदेरी गदा पटकावण्याच्या प्रतीक्षेत आहे. यंदा पुण्यात बुधवारपासून सुरू होणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी माती गटातून किरण भगत तर गादी गटातून तुषार ठोंबरे आखाड्यात उतरले आहेत. जिल्हावासीयांच्या अपेक्षेचे ओझे खांद्यावर घेऊन दोन्ही मल्ल महाराष्ट्र केसरी जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. यापूर्वी साताऱ्याने महाराष्ट्र केसरीची चार अजिंक्य पदके पटकावली आहेत. यंदाच्या स्पर्धेत भगत हाच सातारकरांसाठी आशेचा किरण असून, तो जिल्ह्याच्या अजिंक्यपदाचे पंचक पूर्ण करणार का? आणि महाराष्ट्र केसरीत साताऱ्याचा शब्द घुमणार का? याकडे कुस्ती शौकिणांचे लक्ष लागून राहिले आहे.

१९६१ मध्ये औरंगाबादमधील पहिल्या अधिवेशनात सांगलीच्या दिनकर दह्यारी यांनी विरोधी मल्लाला चितपट करुन महाराष्ट्र केसरी अजिक्यपद परंपरेचा श्रीगणेशा केला. ६३ वर्षांच्या कालावधीत साताऱ्याचे चौघेजण महाराष्ट्र केसरी झाले आहेत. यामध्ये १९८१ साली ढवळ, ता. फलटण येथील बापू लोखंडे यांनी कोल्हापूरच्या सरदार कुशाल याला चितपट करत महाराष्ट्र केसरीची पहिली गदा जिल्ह्यात आणली होती. त्यानंतर १९९४ साली आटके, ता. कराड येथील संजय पाटील यांनी सोलापूरच्या मौला शेख याला चिपतट केले. १९९८ मध्ये मिरगाव, ता. फलटण येथील गोरखनाथ सरक यांनी मौला शेख याला तर १९९९ मध्ये नागाचे कुमठे, ता. खटाव येथील धनाजी फडतरे यांनी राजेश गरगुजे याला चितपट केले होते. त्यानंतर मात्र साताऱ्यात महाराष्ट्र केसरीची गदा आलेली नाही.

गतवर्षी सातारला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यजमान पद मिळाले होते. त्यात किरण भगत आणि अभिजीत जाधव यांनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळी त्यांना हार पत्करावी लागली होती. मात्र, दि. ११ ते १४ जानेवारी दरम्यान, पुण्यात होणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात जिंकू किंवा मरु या निर्धाराने किरण भगत व तुषार ठोंबरे उतरणार आहेत.

यंदा साताऱ्याचे महाराष्ट्र केसरी अजिंक्यपदाचे 'पंचक' पूर्ण करण्यासाठी भगत याने जोरात तयारी सुरू केली आहे. केवळ साताऱ्यातच नव्हे तर राज्यभरात किरणचे नाव घेतले जाते. सध्या ऑलिम्पिकवीर सुमित मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील छत्रसाल आखाडा किरणचा कसून सराव सुरू आहे. मैदानी कुस्तीत पुण्यात माऊली जमदाडे, राष्ट्रीय उपविजेता मनजीत खत्री, हिंदकेसरी बंटी कुमार आणि रवी गांधारी यांच्यावर मिळवलेल्या विजयामुळे किरणचा आत्मविश्वास बळावला आहे.

राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत वाजवला होता डंका

किरणने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत जिल्ह्याचा डंका वाजवला आहे. ऐन भरात मैदानी कुस्तीत त्याने भल्याभल्यांना पराभवाचे खडे चारले आहेत. नगरला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटातून खेळताना नागपूर आणि वारजे येथे (पुण्यात) विजय चौधरीकडून किरणला गुणांवर पराभव पत्करावा लागला होता. भुगावला माती गटातून अंतिम फेरी गाठलेल्या किरणकडून गदेच्या आशा उंचावल्या होत्या. अंतिम फेरीत पुण्याच्या अभिजित कटकेने पराभूत केल्याने उपमहाराष्ट्र केसरी पदावर त्याला समाधान मानावे लागले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news