सातारा : पुढारी वृत्तसेवा
वरिष्ठ राज्य गादी, माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढती अजिंक्यपद स्पर्धा प्रकारामध्ये मोडतात. महाराष्ट्र केसरी विजेत्या कुस्तीगिरास गेल्या 15 ते 20 वर्षांपासून रोख बक्षीस देण्याची प्रथा सुरू झाली आहे. परंतु, विजेत्याला किती रोख रक्कम द्यावी याबाबतची अधिकृत तरतूद नियमावलीमध्ये नाही. आयोजक स्वेच्छेने हे बक्षीस देत असतात, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी दिली.
भोंडवे यांनी सांगितले की, 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजकपद एका कंपनीने झटकल्यानंतर याचे यजमानपद सातार्याला मिळाले. या स्पर्धेत पावसाने व्यत्यय आणला तरी सातारा जिल्हा तालीम संघाने ही स्पर्धा यशस्वी केली. कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने महाराष्ट्र केसरीची चंदेरी गदा जिंकली. मात्र, आपल्याला बक्षीस म्हणून रोख रक्कम मिळाली नसल्याची खंत त्याने बोलून दाखवली. त्यानंतर राज्यभरात एकच गदारोळ उडाला. यानंतर सातार्यासह राज्यातून पृथ्वीराजवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
यानिमित्ताने महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील बक्षिसाबाबत चर्चांना आता ऊत आला आहे. स्पर्धेचे आयोजन हे कोणीही कुठेही कुस्तीगीर संघटनेची परवानगी घेवून व रॉयल्टी अदा करून घेवू शकते. या प्रकारच्या निमंत्रित स्पर्धेमध्ये आयोजक रोख रक्कमेचे भरघोस बक्षीस ठेऊन कोणत्याही कुस्तीगीराला सहभागी करून घेऊ शकतात. या स्पर्धेमध्ये कुस्तीगीरांचा सहभाग हा फक्त रोख रक्कमेचे बक्षीस आहे म्हणूनच होत असतो.
वरिष्ठ राज्य गादी, माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढती अजिंक्यपद स्पर्धा प्रकारामध्ये मोडतात. 15 ते 20 वर्षांपासून महाराष्ट्र केसरी किताब विजेत्यास रोख बक्षीस देण्याची प्रथा सुरू झाली. परंतु, याबाबत अधिकृत नियमावली नाही. महाराष्ट्र केसरी विजेत्यास किती रक्कम द्यावी हे निश्चित नाही. हे आयोजक ठरवत असतात, असेही भोंडवे यांनी म्हटले आहे.
जिल्हा तालीम संघाला पैलवान पृथ्वीराज पाटील याला 1 लाख रुपये देणे फार मोठी गोष्ट नव्हती. परंतु पावसाने झालेला खेळखंडोबा व कुस्तीगीर परिषदेचा समन्वयाचा अभाव यामुळे कदाचित रोख बक्षीस राहून गेले असेल, असे पै. भोंडवे यांनी स्पष्ट केले.