

कुडाळ : प्रसन्न पवार जून महिना संपत आला असून, अजूनही पावसाची वाट पाहावी लागत आहे. पावसाअभावी शेतकर्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. यावेळी मान्सूनपूर्व पाऊसही फारसा न झाल्याने शेती मशागतीची कामे वेळेत करता येत नाहीत. मान्सून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला साधारणपणे पहिल्या, दुसर्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाचे अंदाज चुकू लागले आहेत.
यावर्षी उन्हाळी पाऊसही फारसा झालेला नाही, परिणामी शेती मशागतीची कामे अजूनही खोळंबली आहेत.पुरेसा पाऊस न पडल्याने नांगरलेल्या शेतातील ढेकळे सुद्धा फुटलेली नाहीत. पावसाअभावी धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. यामुळे सर्वांच्याच नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. हवामान खात्याने यावर्षी मान्सून चांगला बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या लांबणार आहेत. शेतकर्यांनी पाऊस वेळेवर होईल या आशेने बी-बियाणे, खते एकत्रित करून पेरणीची तयारी करून ठेवली आहे.
जावलीच्या पश्चिम भागातील शेतकरी धूळवाफेवर पेरणी करतात. दरवर्षीप्रमाणे पश्चिम भागातील शेतकर्यांनी धूळवाफेवर पेरणी केली आहे. भात लागवडीसाठी तरवे टाकले असून, पावसाअभावी ते करपू लागले आहेत. पावसाच्या विलंबाने रोपेही पुन्हा तयार करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसणार आहे.