पाचगणी : पुढारी वृत्तसेवा कधी रिमझिम पाऊस तर कधी बरसणार्या जलधारा तर कधी ऊन, तर कधी डोंगरारांगावर पसरणारे धुके असा नजारा पाचगणीत दिसू लागला आहे. वीकेंडची वेळ गाठत शनिवारी पाचगणीतील विविध पॉईंटस्वर पर्यटकांनी गर्दी केली होती. यावेळी पर्यटकांनी श्रावणधारांचा आनंद घेतला. वर्षाऋतूंचा हंगाम बहरू लागल्याने पर्यटनालाही बहर आला आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
श्रावण महिन्यात पावसाने उघडीप दिली असल्याने येथील निसर्ग बहरू लागला आहे .येथील डोंगर रांगा हिरव्यागार झाल्या आहेत. धबधबे फेसाळू लागले आहेत. त्याला धुके व थंडीची जोड मिळाल्याने येथील निसर्ग अधिक खुलला आहे. बदलत्या निसर्गाच्या विविध रूपांनी धरणी माता हिरवा शालू परिधान केल्यासारखी भासत आहे या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी शनिवारी पाचगणीतील विविध पॉईंटस्वर गर्दी केली होती. येथील टेबल लॅण्ड ,सिडने पॉईंट, पारसी पॉईंटवरून दिसणारे धोम जलाशयाचे रूप पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. श्रावणात मुसळधार पाऊस नसला तरी पावसाची भुरभुर सुरूच आहे. या हलक्य सरींचा आनंद पर्यटक घेत आहे. उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळी पर्यटनास हळूहळू बहर येवू लागला आहे.
पाचगणीप्रमाणेच आता पुस्तकाचे गाव भिलार हे सुद्धा पर्यटकांसाठी आवडीचे ठिकाण झाले आहे.उन्हाळी हंगामातील थंड हवेच्या या ठिकाणची खासियत असलेल्या स्ट्रॉबेरीची, मलबेरी रासबेरीची जागा आता मक्याच्या कणसांनी व गरमागरम भुईमुगाच्या शेंगांनी घेतली आहे. पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी धुक्याच्या साम्राज्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.