नववर्ष स्वागताचा उत्साह; महाबळेश्वरात पर्यटकांची गर्दी

नववर्ष स्वागताचा उत्साह; महाबळेश्वरात पर्यटकांची गर्दी
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा : निर्बंधमुक्त वातावरणात तब्बल दोन वर्षांनी सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागताचा दणकेबाज सोहळा थर्टीफर्स्टच्या मध्यरात्री जिल्हाभर चांगलाच रंगला. शनिवारी मध्यरात्री जिल्हाभरात उत्साही व जल्लोषमय वातावरणाला उधाण आले. महाबळेश्वर येथे सरत्या वर्षाचा अखेरचा सूर्यास्त टिपण्यासाठी बॉम्बे पॉईंट येथे पर्यटकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

मागील दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे घरच्या थर्टीफर्स्ट साजरा करावा लागाला. मात्र यावर्षी तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्तीत थर्टीफर्स्ट साजरा होत असल्याने नागरिकांमध्ये विशेषतः तरुणाईमध्ये उत्साहाला उधाण आले होते. मागील वर्षांतील कसर भरून काढण्याचा चंगच बांधला होता. त्यामुळे अवघ्या जिल्ह्यात २०२२ या सरत्या वर्षाला निरोप व २०२३ या नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात विविध तरुण मंडळे, सामाजिक संस्था, संघटना यांनी थर्टीफर्स्टच्या विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. तरुणाईसह नागरिकांच्यावतीने ठिकठिकाणी पार्यांचे आयोजन करण्यात आले होते. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर व परिसरातील विविध हॉटेल्स, ढाबे यासह ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे परिसर विद्युत रोषणाईने फुलून गेला होता.

तसेच रंगरंगोटी, आकर्षक सजावटीसह प्रसन्न वातावरण निर्मिती करुन विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील हॉटेल्स, ढाबा चालकांनी जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सवलतीच्या योजना दिल्या होत्या. सातारा शहरासह पाचगणी, महाबळेश्वर, कराड, पाटण, वाई, फलटण, माण, खटाव, जावली यासह विविध ठिकाणच्या हॉटेल्स, ढाब्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

काही ठिकाणी फॅमिलीसह येणाऱ्या ग्राहकांना खास पॅकेज, स्वतंत्र व्यवस्था, नवनवीन डिशची व्यवस्था करण्यात आली होती. हॉटेल्स, ढाबे, चायनीज सेंटर्समध्ये चिकन कॅसुनेट, चिकन सॉल्टर, चिकन साठे, सीफूडमध्ये फॉर्म हैद्राबादी, मिरची मसाला, सुरमई चखनार, गार्लिक सुरमई, सुरमई हैद्राबादी मसाला, पॉपलेट हैद्राबादी, अमृतसर, चिकन गुलमर्ग हंडी यासह विविध प्रकारच्या लज्जतदार डिशेस ग्राहकांच्या जिभेवरील चोचले पुरवत होत्या.

मटण, चिकन, माशांसह मद्यावर अनेकांनी यथेच्छ ताव मारला. थर्टीफर्स्ट निमित्त आयोजित पार्यांमध्ये संगिताच्या तालावर धुंद होत तरुणाईने मावळत्या वर्षाला निरोप देवून जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. काही अतिउत्साही तरुणाईकडून अनेक ठिकाणी रस्त्यांवर हॅप्पी न्यू इयर लिहून तसेच ठिकठिकाणी नववर्षाचे शुभेच्छा फलक झळकवण्यात आले. दरम्यान, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना शुभेच्छा देण्याची पध्दत आहे. त्यानुसार विविध शुभसंदेश देणारी शुभेच्छा पत्रेही युवक-युवतींनी पाठवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news