‘धर्मवीर’ भूमिपुत्राच्या बंडाने गाजले ‘दरे’खोरे

"तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही" एकनाथ शिंदेचे शिवसेनेला प्रतिउत्तर
"तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही" एकनाथ शिंदेचे शिवसेनेला प्रतिउत्तर

महाबळेश्‍वर : विशेष प्रतिनिधी धर्मवीर चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे विचारतात, 'एकनाथ कुठेय? नेमका हाच सवाल महाराष्ट्रातील जनता विचारत असतानाच महाबळेश्‍वर – जावलीच्या दर्‍याखोर्‍यात जन्मलेल्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातला आजवरचा सर्वांत मोठा राजकीय भूकंप घडवत बंडाचे ऐलान सुरु केले. 10-12 म्हणता म्हणता 46 आमदार फोडून शिवसेनेचा स्वतंत्र गट तयार केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून वारसाहक्‍काने आलेले शिवसेनाप्रमुख पद उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्याने सध्या उद्धव ठाकरेंच्या ताब्यातील आख्खी शिवसेनाच एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या ताब्यात घेतल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले. त्यामुळे अस्वस्थ झालेली मातोश्रीही 'नाथा पुरे आता' असे म्हणत असेल. धर्मवीर भूमिपुत्राच्या या भीम पराक्रमाने दरे -खोरेही देशभर गाजू लागले आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचं मुळ गाव. शिक्षणासाठी ते ठाण्यात आले होते. पण, गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी एका मासळी विकणार्‍या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम केलं. पण, त्यातून मिळकत होत नव्हती म्हणून शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांचं वय होतं 18.

वयाच्या 18 व्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीमारही खाल्ला.मितभाषी, संयमी, पण आंदोलनात आक्रमक असलेल्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपा झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शिवसेना शाखाप्रमुख बनले. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात फ्रंटवर असलेल्या एकनाथ शिंदेंना 1997 हे वर्ष अत्यंत लकी ठरलं. 1997 मध्ये त्यांना आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले. या निवडणुकीत शिंदे घवघवीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले.

सभागृह नेते म्हणून पालिका गाजवल्यानंतर 2004 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर 2014 मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती तेव्हा 12 दिवसांसाठी ते गटनेते झाले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत आल्यानंतर ते मंत्रीही झाले. एकनाथ शिंदे यांनी 2015 ते 2019 पर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. 2019 मध्ये ते पुन्हा कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत.

नम्र व मितभाषी स्वभाव, कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत. 2014 च्या मोदी लाटेतही शिंदेंनी ठाण्यात शिवसेनेची पडझड होऊ दिली नाही. कार्यकर्त्यांचं गार्‍हाणं ऐकूण घेण्याची क्षमता आणि मास बेस असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे एकनाथ शिंदेंचं योगदान मोठं आहे. ठाणे महापालिका, जिल्हा परिषदा, अंबरनाथ नगरपरिषद, कल्याण-डोंबिवली पालिका, बदलापूर नगरपरिषदेपासून ते नाशिकपर्यंत शिंदे यांनी शिवसेनेचं जाळं विणलं आहे. ठाण्यापासून नाशिकपर्यंत त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो.

एकनाथ शिंदे यांना गरीबीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. इयत्ता दहावीपर्यंतच ते शिकले. त्याचं शल्य त्यांना होतं. 56 व्या वर्षी ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. या परीक्षेत त्यांना 77.25 टक्के गुण मिळाले. ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयातून त्यांनी पदवी परीक्षा दिली होती. स्वत:चं शिक्षण कमी झालं असलं तरी त्यांनी त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना डॉक्टर बनवलं. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण, हा शिवसेनाप्रमुखांनी दिलेला मूलमंत्र त्यांनी कायम जपला.सत्तेपेक्षा संघटना विस्तारात त्यांनी मोठे काम केले. ठाणे शहर शिवसेना शाखाप्रमुख ते नगरसेवक, सभागृह नेता, आमदार, अल्पकालीन विरोधी पक्षनेता आणि दोन टर्म मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा सहवास हे दोन्ही घटक त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण देणारे ठरले. 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. 'शिवसेनेचे ठाणे' अशी ओळख निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. ठाणे जिल्हा लोकसंख्येने आणि भौगोलिकदृष्ट्याही खूप मोठा आहे. प्रकाश परांजपे त्यानंतर आनंद परांजपे यांनी सातत्याने ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या माध्यमातून विजय संपादन केला.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर 2004 ची लोकसभा निवडणूक हे ना. शिंदे यांच्यासाठी एक आव्हान होते. ना. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे आव्हान समर्थपणे पेलले. त्यावेळी प्रकाश परांजपे हे वसंतराव डावखरे यांचा पराभव करून लोकसभेत पोहोचले. त्यावेळी विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेल्यावर शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारीही एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. अशी दोन्ही पदे भुषवणारे ते पहिले शिवसैनिक ठरले. शिवसेनाप्रमुखांचा त्यांनी संपादन केलेला विश्वास तसेच धर्मवीर आनंद दिघेंप्रमाणे संघटनेसाठी सर्वस्व झोकून काम करण्याची त्यांच्या अंगी असलेली धडाडीच याला कारणीभूत ठरली ! हेच एकनाथ शिंदे बंड करुन उठले आहेत. त्यांच्या बंडाने महाराष्ट्राला हादरा बसला आहे. 46 बंडखोर आमदारांचा नायक जावळीच्या दर्‍या-खोर्‍यात जन्मला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र जसा एकनाथ शिंदे यांच्या ज्वलंत हिंदूत्वाकडे पहात आहे तसाच ते ज्या परिसरातून ठाण्यात गेले तो परिसरही आपल्या भूमिपुत्राचे बंड अभिमानाने पहात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news